पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी, स्वराज्यासाठी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांनी धर्म आणि स्वराज्यासाठी तडजोड केली नाही. अजिददादा सारख्या माणसांनी असं बोलणं योग्य नाही. त्यांनी योग्य माहिती घेवून आणि तारतम्य बाळगून बोलायला पाहिजे. कारण त्यांनी महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांवर मोठी टीका केली होती. आता आम्ही काय करायच? त्यांचे अशा प्रकारचे वक्तव्य निंदाजनक आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील विधानानंतर दिली.
सिल्लोड येथे कृषिप्रदर्शन कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी मुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ही राजकारण करण्याची वेळ नाही. बोलताना सगळ्यांनी माहिती घेवून बोललं पाहीजे, एवढीच अपेक्षा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी बलिदान दिलं आहे. धर्मवीर पदवी आपण दिलेली नाही. त्यांनी धर्म आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांना वर्षानुवर्षे धर्म संरक्षक म्हणतात. अजितदादा सारख्या माणसांनी असं बोलणे योग्य नाही. त्यांनी योग्य माहिती घेवून बोलायला पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात लागलेल्या आगीबाबत बोलताना ते म्हणाले, तिथे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. ११ जखमी लोकांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. २ गंभीर आहेत. आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार जखमींचा सर्व खर्च करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात बोलताना अजित पवार म्हणाले की, बाल शौर्य पुस्कार हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर असा उल्लेख करतात. संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असाच करावा, असे मंत्रिमंडळात असतानाही सांगितले होते. असे विधान त्यांनी केले होते.