सत्तेचा गैरवापर करणारे आमचे सरकार नाही : शंभूराज देसाई | पुढारी

सत्तेचा गैरवापर करणारे आमचे सरकार नाही : शंभूराज देसाई

सातारा : पुढारी वृत्तसेवा : मी कुठलेही गैर काम केले नाही. माझे सर्व व्यवहार स्पष्ट आहेत. महाबळेश्वरच्या बांधकामाबाबत झालेल्या आरोपावर कोणत्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे, असे सांगून पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सत्तेचा गैरवापर करणारे आमचे सरकार नसल्याचे ठणकावून सांगितले.

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ना. शंभूराज देसाई म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप मिळून आगामी निवडणुकीत २०० हून अधिक जागा निवडून आणणार आहे. सत्तेचे गैरवापर करणारे हे सरकार नाही. आत्तापर्यंत चुकांवर पांघरुण घातले गेले. मात्र, इथून पुढे असे होणार नाही. चुकला असेल, गुन्हा केला असेल, गैरव्यवहार केला असेल तर त्याची चौकशी होणार, असा इशाराही त्यांनी दिला.

ना. देसाई म्हणाले, शिंदे आणि फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशन जास्त वेळ वाया न घालवता ठरवलेल्या वेळेत पूर्ण केले. विरोधक जरी दोनच आठवड्यांत अधिवेशन उरकले असल्याचा आरोप करत असले तरी महाविकास आघाडी सरकारने दोन दिवस तरी अधिवेशन घेतले का? ते सांगावे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना कोयना व्यवस्थापनाने नोटीस बजावल्याच्या झालेल्या व्हायरल पोस्टबाबत विचारले असता ना. देसाई म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या गावी अनेकदा जावून आलो असून तेथे पूररेषेमध्ये कोणतेही बांधकाम नाही.

सीमाप्रश्नाबाबत खा. पवार यांनी केलेल्या टीकेबाबत ते म्हणाले, शरद पवार हे खूप मोठे नेते आहेत. त्यांच्यापुढे आम्ही लहान आहोत. पण कामातून आम्ही शरद पवार यांना दाखवून देवू की वयाने लहान असलो तरी आम्ही लहानसुद्धा चांगले काम करू शकतो, असे ना. देसाई म्हणाले.

Back to top button