काम करा, नाहीतर जागा रिकामी करा : अमित शहा | पुढारी

काम करा, नाहीतर जागा रिकामी करा : अमित शहा

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणूक तयारीसाठी कर्नाटक दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजप नेत्यांना चांगलाच दम दिला. निवडणुकीत पुन्हा पक्ष सत्तेवर आणण्यासाठी अपेक्षेप्रमाणे काम करा नाही तर जागा रिकामी करा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या.

पक्षातील अंतर्गत मतभेद, अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवावेत. महिनाभरात ही स्थिती सुधारावी. कर्नाटक भाजपमध्ये घडलेल्या लहानमोठ्या सर्व घडामोडींची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचली आहे. त्याची गांभीर्याने अमित शहा दखल घेण्यात आली आहे. कोणत्याही कारणास्तव स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी स्थानिक पक्षाशी हातमिळवणी करु नये. राजकीय स्वार्थासाठी स्थानिक पक्षाशी हातमिळवणी करु नये. पक्ष संघटना मजबूत करावी. पक्ष आणि सरकारने सरळमार्गी असावे. आपल्याला केवळ चांगला निकाल हवा असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसइतकाच निजद पक्षही विरोधक आहे. त्यामुळे त्या पक्षाबाबत सहानुभूती नसावी. त्या पक्षापासून लांब रहावे. पक्ष कार्यकर्त्यांनी बूथ पातळीवर सर्वांपर्यंत पोचावे, अशी सूचना त्यांनी दिली.

इतर पक्षाशी हातमिळवणी केल्यास विश्वासघात केल्यासारखे होईल. जुने म्हैसूर भागात निजद आणि भाजपचा काहीच संबंध नाही. आपल्याशी संबंध असल्याचे सांगून निजद याचा फायदा उठवू शकतो. याबाबत सर्वांनी खबरदारी बाळगावी. त्यासाठीच स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करत आहे. जुने म्हैसूर भागात ३५ पेक्षा अधिक जागा जिंकाव्यात. बंगळूर भागात वीस जागा मिळतील. इतर ठिकाणीही चांगले यश मिळेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button