पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; कोरोनानंतर पहिलाच मोठा दौरा | पुढारी

पंतप्रधान मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर; कोरोनानंतर पहिलाच मोठा दौरा

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (बुधवारी) अमेरिका दौऱ्यावर  जाणार आहेत. सकाळी ११.०० वाजता अमेरिकेच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. २६ सप्टेंबर रोजी ते भारतात परतणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांसोबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश आहे.

पाच दिवसांच्या आपल्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान क्वॉड समिट, कोविड ग्लोबल समिटमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात ते सहभागी होणार आहेत. करोना महामारीनंतर मोदींचा हा पहिलाच मोठा दौरा आहे. मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या पदग्रहणानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत.

अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये भेट होणार आहे.

यावेळी दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यामध्ये लोकशाही, मानवाधिकार आणि हवामान या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता आहे.

असा असेल दौरा

चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांचा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे. पंतप्रधान बुधवारी सकाळी दिल्लीहून रवाना होतील.

रात्री उशिरा ते वॉशिंग्टनला पोहोचतील. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक,

व्हाइट हाऊसमध्ये क्वाड देशांच्या नेत्यांची शिखर परिषद, ऑस्ट्रेलिया आणि जपानच्या पंतप्रधानांसोबत बैठक,

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यासोबत चर्चा,

अमेरिकी कंपन्यांचे सीईओ आणि उद्योगपतींसोबत बैठका आणि २५ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७६ व्या आमसभेत ते भाषण करतील.

कोणत्या विषयांवर होणार चर्चा?

मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांच्या आढाव्याव्यतिरिक्त अफगाणिस्तानमधील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेली प्रादेशिक सुरक्षेची स्थिती, कट्टरतावाद, सीमापार दहशतवादाला आळा घालणं, दहशतवादाचे जागतिक जाळं संपुष्टात आणणं या विषयांवर उभय नेत्यांत चर्चा होईल. द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेताना उभय नेते व्यापक जागतिक भागीदारी, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य, स्वच्छ ऊर्जा भागीदारी, नव्या तंत्रज्ञानाला चालना देण्यावर भर देतील, अशी माहिती मंगळवारी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा : 

Back to top button