भारतात तयार होतेय आशियातील पहिली फ्लाईंग कार | पुढारी

भारतात तयार होतेय आशियातील पहिली फ्लाईंग कार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जमिनीवरून धावणारी कार हवेतही उडू शकणार, हे आता स्वप्न राहिलेले नाही. लवकरच भारतात ही बाब प्रत्यक्षात येणार आहे. अमेरिकेतील मध्यवर्ती हवाई वाहतूक प्रशासनाने फ्लाईंग कार ला आधीच परवानगी दिली आहे. अमेरिकेसह जगातील काही कंपन्या अशा कार बनविण्यात व्यग्रही झाल्या आहेत. आता भारतातील व्हिनाटा एअरोमोबिलिटी कंपनीफचे नावही या यादीत समाविष्ट झाले आहे.

चेन्नईतील या कंपनीने हायब्रिड फ्लाईंग कार बनविली आहे. कंपनीने पहिल्यांदा कारचे मॉडेल केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना दाखविले. शिंदे ते पाहून आश्वस्त झाले. अमेरिकेत परवानगी मिळालेली फ्लाईंग कार दहा हजार फूट उंचीवर उडू शकणार आहे आणि भारतात तयार झालेल्या या मॉडेलची तेवढीच क्षमता आहे.

5 ऑक्टोबरला लाँचिंग

कंपनीने अधिकृत यूट्यूब चॅनलवर 14 ऑगस्ट रोजी एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानुसार ही कार 5 ऑक्टोबर रोजी लाँच होणे शक्य आहे. तेव्हाच या कारची किंमतही जाहीर होईल.

हायब्रिड कार काय?

हायब्रिड कारला दोन इंजिन असतात. द्रव इंधनासह इलेक्ट्रिक मोटार असते. हे तंत्र हायब्रिड म्हणून ओळखले जाते.

अशी आहे ही भारतीय कार

कारचा पुढील भाग दिसायला बुलेट ट्रेनसारखा आहे. कारप्रमाणेच चेसिस आहेत आणि त्यात चाके बसविली आहेत. याच भागात फ्लाईंग विंग्स (पाती) जोडण्यात आली आहेत. त्यासाठी चारही बाजूंना रॉड आहेत. चौफेर काळ्या काचांचा वापर करण्यात आला आहे. या कारचे वजन 1100 किलो असून, ती 1300 किलो वजन वाहून नेऊ शकते. कारमधील एअरक्राफ्ट हायब्रिड इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग प्रकारातील आहे. अन्य सुविधाही यात आहेत.

या कंपन्यांच्याही फ्लाईंग कार

* जपानची स्कायड्राईव्ह इंक कंपनी 2023 पर्यंत आपली कार लाँच करणार आहे. 30 मिनिटांपर्यंत ही उडू शकणार आहे.
* डच कंपनी ‘पॉल-व्ही इंटरनॅशल’ने लिबर्टी नावाची कार बाजारात आणली आहे. ही 500 किमीपर्यंत उडू शकेल.
* अमेरिकन स्टार्टअप कंपनी ‘नेक्स्ट फ्युचर मोबिलिटी’तर्फे तयारी सुरू आहे. ही कार 241 किमीपर्यंत उडू शकेल.
* भारतातील फ्लाईंग कारची क्षमता किती असेल, हे अद्याप समोर आलेले नाही.

व्हिनाटा एअरोमोबिलिटी आशियाची पहिलीवहिली फ्लाईंग कार लवकरच तयार होऊ घातली आहे. लोक या कारचा आनंद घेतीलच, पण आपत्कालीन वैद्यकीय सुविधांसाठीही या कारचा उपयोग होणार आहे.
– ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

Back to top button