मुंबई, पुढारी ऑनलाईन : खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली असून ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार दिला नव्हता, अशी आठवण काँग्रेसने करून दिली आहे.
राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे करोनामुळे गेल्या वर्षी १६ मे रोजी पुण्यात निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
या जागेसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
मात्र, ही निवडणूक बिनबिरोध व्हावी, असे काँग्रेसजणांना वाटत आहे.
मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील सध्याचे वातावरण फारसे चांगले नाही.
त्यामुळे काँग्रेसच्या आवाहनला भाजप कितपत प्रतिसाद देते याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार रजनीताई पाटील या सध्या जम्मू, काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. याआधीही रजनी पाटील राज्यसभेवर होत्या.
त्यांना पुन्हा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही त्यांचे नाव होते.
मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. रजनी पाटील यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई भाजपचे सरचिटणीस उपाध्याय हे आज सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज विधानभवनात दाखल करणार आहेत, असे भाजपने जाहीर केले आहे.
ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यातील प्रथा-परंपरेची आठवण करून दिली आहे.
त्यासाठी त्यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची आठवण करून दिली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती.
मात्र, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली हे दुर्देव आहे.
नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. राजकारणात काही संकेत असतात.
तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू. राजकारणात काही संकेत असतात, असे थोरात म्हणाले.
काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार श्रीमती रजनीताई पाटील आज दुपारी १ वाजता विधानभवनात महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा :