अहमदनगर महापालिका: महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा बोरूडे - पुढारी

अहमदनगर महापालिका: महिला-बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा बोरूडे

नगर; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मीना चोपडा यांचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. दरम्यान, उद्या होणार्‍या निवडणुकीत या सभेत या दोघांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी उद्या (दि.15) निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

सोमवारी (दि.13) सभापतीपदासाठी शिवसेनेच्या पुष्पा बोरूडे व उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या मीना चोपडा यांनी उमदेवारी अर्ज दाखल केले होते.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज अखेरची मुदत होती. या कालावधीत इतर कोणाही इच्छुक उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.

त्यामुळे सभापती व उपसभापतीपदासाठी अनुक्रमे बोरूडे व चोपडा यांचेच अर्ज दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या अधिकृत घोषणा होईल.

Back to top button