ईडीकडे तक्रारीनंतर हसन मुश्रीफांनी शरद पवारांकडे मांडली बाजू | पुढारी

ईडीकडे तक्रारीनंतर हसन मुश्रीफांनी शरद पवारांकडे मांडली बाजू

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुश्रीफांनी शरद पवारांकडे मांडली बाजू : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून यासंदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट केली.

सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी दोघांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी पवारांशी
चर्चा केली. हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख ईडीच्या जाळ्यात आले असताना आता मुश्रीफ यांना भाजपकडून टार्गेट करण्यात आल्याने पवार चिंतेत आहेत.

मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपावर आपली बाजू मांडताना सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सर्व व्यवहार कायदेशीर आहेत. त्यात काहीही वावगे नाही. यापूर्वीही आयकर विभागाची चौकशी लावून आपल्याला भाजपने गोवण्याचा प्रयत्न केला होता. आता
ईडी आणि अन्य यंत्रणांकडून त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत,असे शरद पवार यांना सांगितल्याचे समजते.

दोन्ही नेत्यांमध्ये या आरोपांना कसे प्रत्युत्तर द्यायचे यावरही चर्चा झाली. दरम्यान दिलीप वळसेपाटील यांच्याशीही शरद पवार यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या मुद्यावर चर्चा केली.

साकीनाका येथील बलात्कार प्रकरण, पुण्यात युवतीवर झालेले सामूहिक अत्याचाराचे प्रकरण आणि अन्य घटनांमुळे राज्यात महिलांवरील
अत्याचारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावर विरोधकही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी वळसे- पाटील
यांच्याशी चर्चा केली व पोलीस यंत्रणा सतर्क करण्याच्या सूचना दिल्या.

हे ही वाचलं का?

 

Back to top button