Pune Crime : आई झाली दुर्गा! पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका | पुढारी

Pune Crime : आई झाली दुर्गा! पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्यानंतर आईने धीराने अपहरण करणाऱ्या परिचारिकेच्या वेशातील महिलेचा रिक्षाने पाठलाग करून अवघ्या दोन तासांत स्वतः आपल्या बाळाची सुखरूप सुटका केली. एवढेच नाहीतर अपहरण करणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांच्या (Pune Crime) हवाली देखील केले. ही घटना गुरुवारी भरदिवसा ससून रुग्णालयात घडली.

याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी वंदना मल्हारी जेठे (वय २४, रा. थिटे वस्ती, खराडी) या महिलेला अटक (Pune Crime) केली आहे. याबाबत कासेवाडी येथे राहणाऱ्या एका २२ वर्षाच्या महिलेने तक्रार दिली आहे. जेठे ही शिक्षित असून बीएससी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. अपत्य होत नसल्याच्या कारणातून तिने बाळाचे अपहरण केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

बाळ दिसून न येताच तिने एकाच हंबरडा फोडला. भरदिवसा रुग्णालयातून बाळाचे अपहरण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक व रुग्णालय प्रशासनाने धावपळ सुरु केली. त्यावेळी एका रिक्षाचालकाने परिचारिकेच्या वेशातील महिलेला लहान बाळाला रिक्षातून घेऊन जाताना पाहिले होते.

रिक्षावाला देखील त्याच्या ओळखीचा होता. त्याने याची माहिती बाळाच्या आईला दिली. यावेळी तिने व तिच्या नातेवाईकांनी प्रसंगावधान राखत दोन रिक्षाच्या मदतीने त्याचा पाठलाग सुरू केला. अपहरण करणारी महिला ज्या रिक्षात बसली होती त्या रिक्षावाल्याला दुसर्‍या एका रिक्षावाल्याने संपर्क केला. त्याला बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेबद्दल माहिती दिली.

त्यावेळी तो रिक्षावाला सावध झाला. अखेर चंदन नगर परिसरात आपण करणाऱ्या महिलेला गाठले. त्यानंतर लहान बाळाची अपहरण करणाऱ्या महिलेच्या तावडीतून बाळाची सुखरूप सुटका केली. आपले बाळ सुखरूप असल्याचे पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले.
त्यानंतर आरोपी महिलेला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आपल्या बाळासाठी आई हळवी देखील येऊ शकते आणि ती दुर्गा देखील होऊ शकते हे त्या महिलेने दाखवून दिले.

व्याकूळ झालेल्या आईने प्रसंगावधान राखत पाठलाग करून बाळाची सुटका केली. ओळखीच्या महिलेच्या जीवावर बाळाला सोडून गेल्यानंतर जेव्हा आई परत आली तेव्हा तिला तिचे बाळ दिसले नाही. तिने एकच हंबरडा फोडला. मात्र एक रिक्षातून परिचारिकेचा गणवेश परिधान केलेली महिला बाळाला घेऊन गेल्याचे माहिती मिळाली. तो रिक्षावाला त्या महिलेला घेऊन गेला आहे याची माहिती दुसऱ्या रिक्षावाल्याला होती. आई व तिच्या नातेवाईकांनी इतर दोन रिक्षा घेऊन अपहरण करणार्‍या महिलेचा पाठलाग केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तिच्या दोन मुलीला घेऊन गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास ससून रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिच्यासोबत एक ओळखीतील महिला होती.

लहान मुलीला त्या ओळखीतील महिलेकडे देऊन तक्रारदार महिला दुसऱ्या मुलीस सोनोग्राफी करण्यासाठी घेऊन गेली. त्यावेळी दुसरी महिला ससूनमधील वॉर्ड क्रमांक ७४ मध्ये मुलीला घेऊन थांबली होती. त्यावेळी नर्सच्या गणवेश घातलेली महिला तिच्याकडे आली. तिने या महिलेला तुमच्या नातेवाईकांनी बोलावले आहे, तुम्ही जा मी बाळाला सांभाळते, असे संगितले. त्या महिलेच्या पतीवर देखील ससूनमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोणी तरी आले असल्याचे समजून ती महिला चिमुरड्या श्वेताला त्या नर्सचे कपडे घातलेल्या महिलेकडे दिले.

कोण नातेवाईक आले आहेत, हे पहायला गेली. त्या महिलेने आजूबाजूला पहिले, पण कोणी नातलग दिसले नाही. त्यामुळे ती लगेच परत वॉर्डमध्ये आली. त्यावेळी तिला ती नर्स व मुलगी जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यामुळे ती महिला खूपच घाबरली. तिने हा प्रकार त्या मुलीच्या आईला सांगितला. त्या मुलीच्या आईने त्या ठिकाणीच हंबरडा फोडला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अनेक दुर्मिळ वस्तूंचा संग्रह असणारे कोल्हापूरचे ओबेरॉय म्युझियम

Back to top button