

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी काल जी नौटंकी केली, कुलुप घेऊन गेल्या, माझे गाळे असतील तर कुलुप लावा असे सांगितले. पुढील वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळू शकतो," असे वक्तव्य भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी शनिवारी सोमय्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले होते. किरीट सोमय्या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. संबंधित विभागानेही यामध्ये माझा संबंध नसल्याचे लिहून दिले असल्याचे सांगितले. यानंतर आज सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन पेडणेकरांवर पुन्हा आरोप केले.
ते म्हणाले की, एक वर्षापूर्वी सर्व संबंधित विभागांकडे तक्रार केली होती. पण उद्धव ठाकरें सरकारच्या दबावामुळे चौकशी झाली नाही. वर्षभरापूर्वी मी सगळे पुरावे दिले आहेत. सध्या पेडणेकरांविरूद्ध सहा ठिकाणी चौकशी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी काल चर्चा झाली आहे. एसआरएचे सीईओंनी चौकशी सुरू केलीय. जनहित याचिकेवरही उच्च न्यायालयात चौकशी सुरू आहे. पेडणेकरांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून व्हावी, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री माझी मागणी मान्य करतील, असे त्यांनी यावेळी म्हटले. कुलूप घेऊन दुकाने आणि घरे बंद करायला निघाला आहात, मग पोलिस चौकशीला का घाबरता, असा सवालही सोमय्या यांनी केला.
हेही वाचा :