

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात पुन्हा एक रोमांचक सामना पहायला मिळाला. रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेचा 4 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 7 बाद 150 धावा केल्या. त्यांच्याकडून नजमुल हुसेन शांतो (71) याने अर्धशतक झळकावले. अफिफ हुसैनने 29, तर शाकिब अल हसनने 23 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत मुजरबानी आणि नागरवा यांनी 2-2 बळी घेतले. विल्यम्स-अलेक्झांडरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या. तस्किन अहमदने तीन आणि मुस्तफिजुर रहमानने 2 बळी घेतले. या विजयासह बांगलादेशने गट 2 च्या गुणतालिकेत भारताची बरोबरी केली आहे. या विजयासह बांगलादेशचेही 4 गुण झाले आहेत. मात्र त्यांचा रनरेट टीम इंडियाच्यापेक्षा कमी असल्याने ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात खूपच खराब झाली. वेस्ली मधवेरे 4 आणि क्रेग एर्विन 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. दोन्ही फलंदाजांना तस्किन अहमदने बाद केले. त्यानंतर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात मुस्तफिझूरने मिल्टन शुम्बा (8)सह फॉर्मात असलेल्या सिकंदर रझा (0) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. झिम्बाब्वेला पाचवा धक्का 69 धावांवर रेगिस चकाबवाच्या रूपाने बसला. त्याला 15 धावांवर तस्किनने आपला तिसरा बळी बनवले. त्यानंतर शॉन विल्यम्सने रायन बर्लसोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले, पण 19व्या षटकात 64 धावा काढून तो धावबाद झाला.
झिम्बाब्वेच्या डावातील शेवटच्या चेंडूवर एक विचित्र घटना घडली. झिम्बाब्वेला विजयासाठी 5 धावांची गरज होती, आशीर्वाद मुजारबानीने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तो यष्टीचीत झाला. इथेच सामना संपल्यासारखे वाटले आणि सर्व खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतायला लागले. मात्र, रिप्लेमध्ये तिस-या पंचांना एक मोठी चूक आढळली. बांगलादेशचा यष्टिरक्षक नुरुल हसनने चेंडू विकेट्सला ओलांडून मागे येण्याआधीच तो झेलला आणि , झिम्बाब्वेच्या फलंदाजाला यष्टीचीत केले. अखेर तिस-या पंचांनी ही चूक निदर्शनास आणून मैदानी पंचांना हा नो-बॉल घोषित करण्याचे सांगितले. त्यामुळे सर्व खेळाडूंना मैदानात परतावे लागले. मात्र, नव्याने मिळालेल्या चेंडूवर सुद्धा झिम्बाब्वेच्या फलंडाजाला फटका मारता आला नाही, डॉट होत तो विकेटकीपरच्या हाती गेला आणि बांगला देशने हा सामना केवळ तीन धावांनी जिंकला.