

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : ओळखीचा गैरफायदा घेऊन महाविद्यालयीन तरुणाला फोन करून बोलावून दुचाकीवर जबरदस्तीने बसून त्याला बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा बनाव केला. तसेच 25 हजारांची मागणी करून तरुणीने चक्क तरुणालाच फसविण्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
याबाबत तरुणीसह एकावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, दोघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता 9 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नितीन शिंदे (वय 28, रा. ढोराळे, ता. बार्शी) व तरुणी अशी याबाबत गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नीलेश पाटेकर (वय 19 रा. तडवळे) या तरुणाने फिर्याद दिली आहे. तडवळे येथील भगवती देवीची यात्रा 5 ऑक्टोबरला होती. तेव्हा अहमदनगर जिल्ह्यातील तरुणी येथे नाचण्यासाठी आलेल्या होत्या. त्यावेळी त्या तरुणीने नीलेश पाटेकर याचा मोबाईल नंबर घेतला होता. दरम्यान, तरुणीने तरुणाला फोन केला व तू कोठे आहेस अशी चौकशी करून, मी बार्शी येथे आलेली असून तू छत्रपती शिवाजी कॉलेजजवळ ये, असे सांगितले.
त्यानंतर थोड्या वेळाने पाटेकर तेथे पोहोचल्यावर पुन्हा तरुणीने फोन करून मी शिवाजी चौकात कुर्डुवाडी रोडवर उभी असून तू तिथे ये असे सांगितले. तरुण तेथे गेला. पाटेकर याने चहा घेऊ असे म्हणताच तरुणीने आपण पुढे धाब्यावर चहा घेऊ असे म्हणून नीलेशच्या दुचाकीवर बसून त्याला कुर्डुवाडी रस्त्यावरील एका लॉजच्या खोलीत नेले. खोलीत तरुणीने अर्धनग्न फोटो काढला. तसेच बाथरुममध्ये जाऊन या तरुणीने हा प्रकार फोन करून सांगितला व बाथरूमम मधून बाहेर आल्यानंतर तरुणाला 25 हजारांची मागणी करत पैसे न दिल्यास, अत्याचार केल्याचे सांगेन अशी धमकी दिली. तरुणाच्या बँक खात्यातील 500 रूपये जबरदस्तीने दुसर्या बँक खात्यावर ट्रान्स्फर करून घेतले. दरम्यान, पोलिसांनी चौकशीअंती दोघांना पोलिस ठाण्यात आणून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.