ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके, भाजपचे मुरजी पटेलांकडून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल | पुढारी

ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके, भाजपचे मुरजी पटेलांकडून शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल

पुढारी ऑनलाईन : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ऋतुजा लटके यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. भाजपचे मुरजी पटेल यांनीही जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. यानंतर राजकीय नाट्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत, आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांकडून, दिग्गज नेत्यांसह शक्तीप्रदर्शन करत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रमुख राजकीय पक्षांची अशी स्थिती असताना, या पोटनिवडणुकीसाठी इतर ३ उमेदवारी अर्जही दाखल झाले आहेत. यावेळी लटके आणि पटेल गटांच्या दोन्ही गटांकडून घोषणाबाजीही करताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यास खबरदारी म्हणून ठाकरे यांच्याकडून संदीप नाईक यांचा डमी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शुक्रवारी अखेरचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर राजकीय घटना संघर्षानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मशाल’ विरुद्ध ‘कमळ’ अशी ही लढत होणार असून  महाविकासआघाडीकडून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध भाजप- शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजपर्यंत तीन उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये दोन अपक्ष उमेदवारांसह क्रांतीकारी जय हिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टी यांनी संयुक्तरीत्या एक उमेदवार दिला असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बहुरंगी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

 

 

Back to top button