नगर : जिल्ह्यातील 205 ग्रा.पं. प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध | पुढारी

नगर : जिल्ह्यातील 205 ग्रा.पं. प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध

नगर : पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभागनिहाय मतदार यादी गुरुवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. नागरिकांना अवलोकन करण्यासाठी मतदार यादी ग्रामपंचायत, तलाठी सजा, मंडलाधिकारी, पंचायत समिती व तहसील कार्यालयांच्या फलकावर उपलब्ध केली आहे. या मतदार यादीवर 18 ऑक्टोबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतींचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सार्वत्रिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरु करुन प्रभागरचना, आरक्षण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.

5 ऑक्टोबर रोजी आयोगाने प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुरुवारी (दि.13) ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. या प्रारुप मतदार यादीवर हरकती दाखल करण्याची संधी राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे 13 ते 18 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करता येणार आहे. उपलब्ध हरकतींवर सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणीनंतर 21 ऑक्टोबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील यांनी सांगितले.

Back to top button