Andheri (East) bypoll: ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा स्वीकारला | पुढारी

Andheri (East) bypoll: ऋतुजा लटके यांचा मुंबई महापालिकेने राजीनामा स्वीकारला

पुढारी ऑनलाईन: मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगपालिकेकडून ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. पालिकेकडून राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे पत्र मुंबई महानगपालिकेकडून लटके यांना देण्यात आले आहे.

ऋतुजा लटके यांना काल सायंकाळी उच्‍च न्‍यायालयाकडून माेठा दिलासा मिळाला होता. त्‍यांचा राजीनामा स्‍वीकारल्‍याचे पत्र शुक्रवारी ११ वाजेपयर्यंत द्या, असा आदेश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने महापालिकेला दिला होता. ऋतुजा लटके यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा प्रशासनाने अद्याप स्वीकारला नाही. त्यामुळे शिवसेनेने उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली होती. तातडीने राजीनामा मंजूर करण्यासाठी पालिका कर्मचारी सेवा नियमानुसार एक महिन्याचा पगारही पालिकेच्या कोषागारमध्ये जमा करण्यात आला होता. याचाच आधार घेऊन, उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  ( Andheri (East) bypoll )

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी  देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानुसार लटके यांनी 2 सप्टेंबर २०२२ रोजी पालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्यात त्यांनी अटी घातल्या होत्या. आपल्याला उमेदवारी मिळाली तर राजीनामा मंजूर करावा. जर मिळाली नाही तर राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यात करण्यात आली होती. त्यावर पालिकेने महिनाभराने उत्तर देत असा राजीनामा मंजूर करता येत नसल्याचे कळवले. परिणामी, लटके यांनी 3 ऑक्टोबरला सुधारित राजीनामा दिला आणि तो तात्काळ मंजूर व्हावा म्हणून नियमानुसार एक महिन्याचा पगारही कोषागारात जमा केला. तरीही हा राजीनामा मंजुरीच्या प्रतीक्षेत होता.

मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब) ठाकरे या गटाकडून त्यांना आता निवडणूक लढता येणार आहे.

Back to top button