मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब यांच्या एका शब्दावर आनंद दिघे का झाले होते शांत… | पुढारी

मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब यांच्या एका शब्दावर आनंद दिघे का झाले होते शांत...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा काल स्मृतीदिन होता. बाळासाहेब ठाकरे यांचा झंजावातात मीनाताई ठाकरे यांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेना घडवण्यात मीनाताईंनी वेळोवेळी मदत केल्याचे अनेक संदर्भ आपल्याला इतिहासात पहायला मिळतात. असाच एक किस्सा आनंद दिघे यांच्या बाबतीत घडला होता याबाबत दिघेंचे समर्थक नंदकुमार गोरूले यांनी फेसबूकवर आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

दिघेंचे समर्थक नंदकुमार गोरूले  यांनी  आपल्‍या  फेसबूक पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, आनंद दिघे यांना मध्यरात्री ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. आम्हाला कुणालाही कळू न देता ते एकटेच रिक्षाने नौपाड्यामधील तांबे हाॅस्पिटलमध्ये पोहचले. पहाटे-पहाटे विजेसारखी ही बातमी ठाण्यावर कोसळली. जिल्ह्यावर चिंतेचं सावट पसरलं.

हरीभाऊ, जावळे, शिवराम, कमलेश, गोट्या, विजय, नितीन, ज्ञानेश्वर, मंदार, संजय, अभय..वगैरे आम्ही ऑफिसची मंडळी व ठाण्यातील सर्वच पक्षाची नेतेमंडळी हॉस्‍पिटलकडे धावली. आजुबाजूचे रस्ते माणसांनी भरुन गेले. .एका छोट्याशा खोलीत साहेबांना ठेवलं होतं. बाजूच्या काॅटवर रात्रभर मी एकटाच बसून असायचो. हॉस्‍पिटलच्‍या रिसेप्शनजवळ आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक, कार्यकर्त्यांसोबत ठिय्या देवून बसले होते.

अचानक आनंद दिघे साहेब  शरीराला जोडलेल्या सलाईनच्या नळ्या -यंत्रांच्या तारांना न जुमानता दरवाजाबाहेर जावू लागले.

मी भेदरलो. मला काहीच कळेना. चिमणीसारखं तोंड करुन त्यांना अडवू लागलो-तर मला ढकलून ते जिन्याच्या दिशेने जावू लागले.तिथे बसलेले आमदार मो.दा., तरे साहेब, ठुसे साहेब, अनिल सावे, माधव मंत्री..आदींचे धाबे दणाणले.

कारण डॉक्टरांनी साहेबांना चार पावलं चालायला सुध्दा मनाई केली होती. त्यांच्या जीवावर बेतू शकलं असतं. त्यांना अडवतांना सगळ्यांना घाम फुटला. ते …”मिरवणूक..देवी..मला बोलावलंय”.. असं काहीतरी पुटपुटत होते.

कसंतरी त्यांना माघारी फिरवून आम्ही पुन्हा रुममध्ये आणले. परंतु झटापट सुरुच होती. मो.दा. तडक रिसेप्शनजवळील फोनकडे धावले.

आता या माणसाला रोखू शकलं तर एकच माणूस..मातोश्री

मोदांनी बाळासाहेबांना निकराची परिस्थिती सांगितली. ‘फोन द्या त्याला !’, असे बाळासाहेबांनी फर्मावले. आम्ही साहेबांना फोनपाशी घेवून आलो. साहेबांनी रिसिव्हर कानाला लावला.

पलीकडून काय कान टोचणं सुरु होतं याचा आम्ही अंदाज बांधत होतो.

जवळ जवळ तीन मिनिटे साहेबांनी ऐकून घेतलं आणि खाडकन् रिसिव्हर फेकून देवून ते तिरमिरीतच आपल्या रुमकडे निघाले.

आम्ही जरासे निश्चिंत झालो. परंतु साहेब पुन्हा हट्ट करणार नाहीत याची खात्री वाटेना.

मीनाताई ठाकरे, बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्यात चर्चा

कदाचित बाळासाहेबांनाही तसंच वाटलं असावं. कारण तासाभरातच स्वत: ते माँसोबत ठाण्यात पोहचले. त्या छोट्याशा खोलीत बाळासाहेब, माँसाहेब, दिघेसाहेब व मी चौघेच होतो. मी गांगरलो होतो. माझ्यासाठी परमभाग्याचा क्षण होता तो.

भानावर येवून मी दोघांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी वाकलो-तर वरच्या खिशातील सुट्टे पैसे खळ्ळकन खाली पडून घरंगळत काॅटखाली पळाले. माझी ती कावरीबावरी अवस्था पाहून माँसाहेब म्हणाल्या.-‘काय रे ! तन मन धन का ?’ . मी बावळटासारखा हसलो.

..साहेबांना विश्रांती घेण्यास बजावून दोघेही निघून गेले. परंतु,तरीही साहेबांनी शेवटी आपलाच हट्ट खरा केला. -तो तणावाचा कालखंड ,त्यातील प्रसंग पुन्हा कधीतरी सांगेन….

…परंतु, माँसाहेबांना त्यानंतर पाहिलं ते अस्थिकलशात सेनाभवनमध्ये.
एक मात्र मान्य करावंच लागेल.वाघाच्या यशात माँसाहेबांचा वाटा सिंहाचा होता.

Back to top button