यवतमाळ : अमृत योजनेच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू | पुढारी

यवतमाळ : अमृत योजनेच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात खोदून ठेवलेले खड्डे जीवघेणे ठरत आहेत. अमृत योजनेतून खोदलेल्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू झाला. शहरातील चर्च रोडवरील संगम चौकात ही संतापजनक घटना काल (सोमवार) उघडकीस आली. या घटनेमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणा आणि अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराविरुद्ध संताप व्यक्‍त हाेत आहे. खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू झाल्‍याने नागरिकांनी रोष व्यक्‍त केला आहे.

बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र, राज्य व नगर परिषदेच्या पुढाकारात ३०२ कोटी रुपयांची अमृत पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली.

सुरुवातीपासूनच या योजनेच्या कामाचे पितळ उघडे पडले. चार वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलेल्या या कामासाठी एक हजार मिमीचे पाईप बेंबळा धरणापासून टाकळी प्लांटपर्यंत टाकण्यात आली. तेथून यवतमाळ शहरात मजीप्राच्या कार्यालयापर्यंत ८०० मिमीची पाईपलाईन टाकण्यात आली.

यवतमाळ शहरातील पाईपलाईनचे लिकेज शोधण्यात दोन वर्षाचा कालावधी लोटून गेला आहे. हे लिकेज शोधण्यासाठी शहरात जागोजागी खदानी खोदल्यासारखे खड्डे काढून ठेवले आहेत.

लिकेज शोधण्यासाठी सहा-सहा महिन्याचा कालावधी लावला जात आहे. चर्च रोडवर असलेल्या संगम चौकलगत खड्ड्याने सोमवारी एक युवकाचा बळी घेतला. शहरातील सर्व खड्डे अगदी वर्दळीच्या भागात आहेत.

योजनेचे काम ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणार होते. दोन वर्षाचा कालावधी लोटला. आणखी जवळपास २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक काम शिल्लक आहे.

सोमवारच्या अपघातानंतरही प्रशासन जागे झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्‍यक्‍त हाेत आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button