एकनाथ शिंदे म्‍हणाले, मी शिवसेनेला कंटाळलोय हा जावईशोध राणेंनी कुठून लावला ? | पुढारी

एकनाथ शिंदे म्‍हणाले, मी शिवसेनेला कंटाळलोय हा जावईशोध राणेंनी कुठून लावला ?

मुंबई ; पुढारी ऑनलाईन: मी शिवेनेला कंटाळलोय हा जावईशोध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला, असा सवाल राज्‍याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिवसेनेला मला नेहमीच संधी दिली आहे. माझी निष्‍ठा कायमस्‍वरुपी शिवसेनेबरोबरच आहे. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वाखालील एकही शिवसैनिकाला कोणालाही हात लावता येणार नाही, असे प्रत्‍युत्तर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे.

राणेंनी केला होता गौप्‍यस्‍फोट

राज्‍याचे नगर विकास मंत्री हे केवळ सहीपुरते मंत्री आहेत. त्‍यांना कोणताही अधिकार नाही. त्‍यांना आपण लवकरच भाजपात घेणार आहोत, असा गौप्‍यस्‍फोट नारायण राणे यांनी शनिवारी वसई येथे पत्रकारांशी बोलताना केला होता.

एकनाथ शिंदे यांना मातोश्रीच्‍या आदेशाशिवाय एकाही सही करण्‍याचा अधिकार नाही. त्‍यामुळे ते शिवसेनला कंटाळले आहेत. त्‍यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपमध्‍ये घेवू आणि महाविकास आघाडी सरकारचे विसर्जन करु, असेही राणे म्‍हणाले होते.

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीच कामात दखल दिली नाही

यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्‍हणाले, मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्‍यावर नगरविकास मंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे.

तेव्‍हापासून त्‍यांनी कधीच माझ्‍या कामात दखल दिलेली नाही. त्‍यांनी दिलेल्‍या पाठबळामुळेच नगरविकास विभागाने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्‍याचबरोबर चांगल्‍या योजनांची अंमलबजावणी केली आहे.

नारायण राणे यांनी स्‍वत: मुख्‍यमंत्री म्‍हणून जबाबदारी संभाळली आहे.

कोणत्‍याही खात्‍याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय होत नाही.

सर्वच विभागाचे धोरणात्‍मक निर्णय हे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याशी चर्चा केल्‍यानंतर घेतले जातात आणि नियमानुसार ते योग्‍यच आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी स्‍पष्‍ट केले.

नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्री आहेत. त्‍यांच्‍या खात्‍याचेही निर्णयही नक्‍कीच पंतप्रधानच मंजूर करत असतील, असेही शिंदे म्‍हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्‍यावर भरभरुन प्रेम केले. उद्धव ठाकरे यांनी माझ्‍यावर अपार विश्‍वास दाखवला आहे यामुळे मी कंटाळण्‍याचा प्रश्‍न येतच नाही, असेही त्‍यांनी ठणकावले.

नारायण राणे यांची जन आशीवार्द यात्रा सुरु आहे. त्‍यांनी जन आशीर्वाद कसा मिळेल, याची काळजी करावी.

शिवसेनेत कोण नाराज आहेत, यावर फुकट वेळ घालवू नये, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वाखालील राज्‍यातील सरकार भक्‍कम आहे.

सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. एकनाथ शिंदे सोडाच;पण एकही शिवसैनिकाला कोणालाही हलवता येणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी ठणकावले.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ : कला क्षेत्रात अनेक चांगल्या संधी : लेखक अरविंद जगताप 

 

Back to top button