राखीपौर्णिमा ही पौर्णिमा अन्यही वेगवेगळ्या नावाने साजरी हाेते | पुढारी

राखीपौर्णिमा ही पौर्णिमा अन्यही वेगवेगळ्या नावाने साजरी हाेते

नवी दिल्ली : श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात असतो. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘ राखीपौर्णिमा’ असे म्हटले जाते. मात्र, देशभरात ही पौर्णिमा अन्यही वेगवेगळ्या नावाने साजरी होते. या दिवशी सर्वत्र रक्षाबंधन साजरे केले जात असले तरी या पौर्णिमेची स्थानपरत्वे वेगवेगळी वैशिष्ट्येही आहेत.

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा देशाच्या पश्चिमेकडील राज्यांमध्ये या पौर्णिमेला ‘नारळीपौर्णिमा’ असे नाव आहे. या दिवशी पावसामुळे खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून त्याला शांत होण्याची प्रार्थना केली जाते.

‘रत्नाकर’ म्हणून ओळखला जाणारा समुद्र मनुष्याला अनेक प्रकारची साधनसंपत्ती देत असतो. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. विशेषतः मच्छीमार, कोळी बांधवांसाठी या सणाचे मोठेच महत्त्व आहे. समुद्राला नारळ अर्पण केल्यावरच नारळीपौर्णिमेनंतर मच्छीमार आपल्या होड्या घेऊन मासेमारीसाठी निघतात.

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हा दिवस ‘अवनी अवित्तम’ म्हणूनही साजरा होतो. मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहारसारख्या राज्यांमध्ये या पौर्णिमेला ‘कजरी पौर्णिमा’ असेही म्हणतात. गुजरातमध्ये या पौर्णिमेला ‘पवित्रपौर्णिमा’ असेही म्हटले जाते.

Back to top button