उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचे आम्हालाही दु:ख, आनंद नाही : एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
Published on
Updated on

पणजी; पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचे दुःख आम्हालाही आहे. ठाकरेंच्या विषयी आमच्या मनात कालही आदर होता आजही आहे, अशी भावना शिंदे यांनी गोव्यातील दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आज गोव्यात आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आमदारांनी कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन केलेले नाही. उद्धव ठाकरे यांना काढण्याचा आमचा हेतू नव्हता. उद्धव ठाकरेंना दुखवावं हा आमचा हेतू नव्हता. ते आमचे नेते आहेत, असे आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

बंडखोर नेते एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी एकनाथ शिंदे गटाची ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये बैठक झाली. "मी राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईला जात आहे. पुढचा निर्णय तुम्हाला सांगतो," असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे केवळ एकनाथ शिंदे आणि आमदार रविंद्र चव्हाण मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. अन्य आमदार गोव्यातच असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांचा गट काल गुवाहाटीवरुन गोव्यात दाखल झाला होता. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रात्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांची भेट घेतली. गोव्यातील ताज कन्व्हेंशन सेंटर येथे ही भेट झाली होती. बुधवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे सर्व ३९ आमदार व इतर अपक्ष आमदार ताज कन्व्हेंशन सेंटर येथे दाखल झाले होते. यानंतर रात्री उशिरा साडेअकराच्या दरम्यानच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतल्याचे समजते.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार बुधवारी (दि.२९) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोव्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार कडक सुरक्षा व्यवस्थेत दोनापावला येथील हॉटेलकडे रवाना झाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दोन ट्विट केली आहेत. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

'मी पुन्हा येईन' हा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरा करून दाखविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्‍यांच्‍या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. शिवसेना बंडखोर आमदार गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सरकार स्थापन करणार आहेत. आता नवीन मंत्रीमंडळात कोणाला स्‍थान मिळणार याची उत्‍सुकता शिगेला पोहचली आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार गोव्याहून आल्यानंतर हा दावा फडणवीस करतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा येईल. भाजपचे २८ कॅबिनेट मंत्री, बंडखोर गटाचे ८ कॅबिनेट मंत्री आणि भाजप व बंडखोरांचे प्रत्येकी ५ राज्यमंत्री अशा ४६ जणांचे मंत्रिमंडळ सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ यादीला भाजप पक्षश्रेष्ठींची अंतिम मंजुरी मिळताच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news