‘मी पुन्हा येईन’ निर्धार खरा करून दाखविला, फडणवीसांचा सत्ता स्थापण्याचा आज दावा | पुढारी

‘मी पुन्हा येईन’ निर्धार खरा करून दाखविला, फडणवीसांचा सत्ता स्थापण्याचा आज दावा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ‘मी पुन्हा येईन’ हा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खरा करून दाखविला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना बंडखोर आमदार गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सरकार स्थापन करतील. ते गुरुवारीच सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटात जल्लोष सुरू झाला आहे. राजीनाम्याची घोषणा होताच भाजपच्या आमदारांनी फडणवीस यांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाजप लवकरच सत्ता स्थापन करून पुन्हा एकदा राज्याला विकासाच्या वाटेवर नेईल, असा विश्‍वास यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप गुरुवारीच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार गोव्याहून आल्यानंतर हा दावा फडणवीस करतील. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा येईल. भाजपचे 28 कॅबिनेट मंत्री, बंडखोर गटाचे 8 कॅबिनेट मंत्री आणि भाजप व बंडखोरांचे प्रत्येकी 5 राज्यमंत्री अशा 46 जणांचे मंत्रिमंडळ सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ यादीला भाजप पक्षश्रेष्ठींची अंतिम मंजुरी मिळताच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल.

संभाव्य मंत्री भाजपमधून चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, संजय कुटे, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर आदींना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रकाश आवाडे, विनय कोरे यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो. बंडखोर गटातून एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संजय राठोड, शंभुराज देसाई, तानाजी सावंत आदी नावांचा मंत्रिमंडळात समावेशासाठी विचार होण्याची शक्यता आहे.

अडीच वर्षांचे सरकार 25 वर्षे चालेल : फडणवीस

भाजपला आता अडीच वर्षे सरकार चालविण्याची संधी मिळणार आहे; पण हे अडीच वर्षांचे सरकार पुढील 25 वर्षे चालेल आणि राज्याचा विकास करेल, असा ठाम विश्‍वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटातील आमदारांचे विशेष आभार मानले. तसेच भाजप आमदारांना पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबईतच राहण्याच्या सूचना केल्या. ते हॉटेल ‘ताज रेसिडेन्सी’मध्ये आमदारांशी बोलत होते.

Back to top button