उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

मुंबई; पुढारी ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या आदेशानुसार आता बहुमत चाचणीची गरज नाही. त्यामुळे आजचे विशेष अधिवेशन होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र विधानमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज ३० जून रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते. ज्या प्रयोजनासाठी अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते, ते प्रयोजन आता आवश्यक राहिले नसल्याने राज्यपालांनी हे अधिवेशन संस्थगित केले आहे, असे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी म्हटले आहे.

राज्यात गेली नऊ दिवस सत्तानाट्य सुरु होते. अखेर एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी ठरले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री आपल्या सरकारचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी, गुरुवारीच अधिवेशन बोलवा आणि बहुमत सिद्ध करा, असे आदेश राज्यपालांनी उद्धव यांना दिले होते. बंडखोरांच्या अपात्रतेचा विषय न्यायप्रविष्ट असताना शक्‍तिपरीक्षा कशी? असा सवाल करीत शिवसेनेने पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. मात्र, न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळताच रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा जाहीर केला आणि राजभवन गाठले. शिवसेनेतील बंडाळीचे ओझे असह्य होऊन ठाकरे सरकार कोसळल्याने महाराष्ट्रात सत्तांतर होत असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार पुन्हा स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Back to top button