बाळासाहेबांना अभिवादन करून नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा | पुढारी

बाळासाहेबांना अभिवादन करून नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा

मुंबई, पुढारी ऑनलाईन; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरू करणार आहेत. १९ ऑगस्टपासून सुरू होणारी ही यात्रा मुंबईतील विविध विभागांत २१ ऑगस्टपर्यंत काढळी जाणार आहे. त्यानंतर कोकणात ही यात्रा जाणार आहे.

नव्या मंत्र्यांनी जनतेशी संवाद साधावा, यासाठी ही यात्रा काढल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, नारायण राणे  जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यामागे आगामी मुंबई महापालिका निवडणुका असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडे मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन ११४’ सोपवल्याचे सांगण्यात येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचे दर्शन घेऊनच राणे यांनी यात्रा सुरू केली आहे.

त्यामुळे, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न राणेंकडून होत असल्याचे दिसून येते.

शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर जाऊन राणे बाळासाहेबांना अभिवादन करतील, त्यानंतर जनआशीर्वाद यात्रा सुरू होईल.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कपिल पाटील आणि भगवान कराड यांनी आपापल्या भागातून जनआशीर्वाद यात्रा सुरु केल्या आहेत.

कराड यांनी गोपीनाथ गडावरून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे.

त्यावेळी मुंडे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून दुफळी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. कराड आणि मुंडे यांच्यात राजकीय वैर आहे. राणे यांनीही जनआशीर्वाद यात्रा मुंबई आणि कोकणातही असेल. पहिल्याच दिवशी ते विमानतळ ते कुलाबा असा प्रवास करणार आहेत.

मुंबई शहर, उपनगर, वसई, विरार, त्यानंतर महाड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदूर्ग अशी राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असेल.
या यात्रेचा भाग म्हणून १७० हून गावांना भेटी देणार आहेत.

भारती पवार यांची जनआशीर्वाद यात्रा पालघर, मनोर, चारोटी, तालसरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडामार्गे सुरू झाली आहे.

राणेंवर मुंबई महापालिकेची जबाबदारी

दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे.

मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याचे भाजपचे मिशन आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे सूत्रे सोपविली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा:

पहा व्हिडिओ: अफगाणिस्तानमध्ये हाहाकार

Back to top button