बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला राणे भेट देऊन गेले, शिवसैनिकांनी शुद्धीकरण करून घेतले! | पुढारी

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला राणे भेट देऊन गेले, शिवसैनिकांनी शुद्धीकरण करून घेतले!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईमध्ये शक्तीप्रदर्शन करत जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

नारायण राणे अभिवादन करून गेल्यानंतर काही शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी थेट दुग्धाभिषेक आणि गोमुत्राने शुद्धीकरण केले. शुद्धीकरण पार पडल्यानंतर फुलेही वाहण्यात आली. या प्रकारानंतर नारायण राणे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

हे उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दीमधील सगळ्यात उत्तम काम असल्याचे म्हणत त्यांनी स्मृतीस्थळ शुद्धीकरणावरुन नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला.

शुद्धीकरण करताना उपस्थित असलेल्या आप्पा पाटील यांनी प्रतिक्रिया देताना राणेंना टोला लगावला. ते म्हणाले की, वास्तू अपवित्र झाल्याने दुग्धाभिषेक करून शुद्धीकरण केले तसेच बाळासाहेबांनी आवडणारी चाफ्याची फुले त्या ठिकाणी वाहिली. त्यांना आज शिवसेना दिसून आली. इतक्या वर्षात त्यांना बाळासाहेब दिसले नव्हते.

नारायण राणे यांना धोबीपछाड देणाऱ्या तृप्ती सावंत यांना स्वागताचा मान

वांद्रे मतदारसंघात २०१५ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना पराभूत करणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनीच आज राणे यांचे मुंबईत स्वागत केले. कधीकाळी राणेंविरोधात निवडणूक लढविलेल्या सावंत आज त्यांच्या स्वागताला गेल्या हा योगायोग जनआशीर्वाद यात्रेमुळे आला.

सावंत या शिवसेनेच्या बिनीच्या शिलेदार होत्या. नारायण राणे यांचा पराभव केल्याने सेनेत त्यांचे वजन होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. परिणामी येथे काँग्रेसची जागा निवडून आली.

नारायण राणे म्हणाले, ‘ते महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईतून जनआशीर्वाद यात्रा सुरु केली. यावेळी संबंधित करताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेत त्यांना सांगूया की तुमचा काळ संपलाय. राज्यात भाजप सत्तेवर येईल आणि सुखा समाधानाचे चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त करुया, असे राणे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी मला दिल्लीला पाठवलं. मी केंद्रीय मंत्रिमंडळात सुक्ष्म, लघू- उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्राचे नाव दिल्लीत केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राणे यांचे आज गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेथून त्यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.

हे ही वाचलं का?

Back to top button