पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : संजय राऊतांना ईडीचे समन्स, उद्या हजर राहण्याचे आदेश | पुढारी

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण : संजय राऊतांना ईडीचे समन्स, उद्या हजर राहण्याचे आदेश

मुंबई: पुढारी ऑनलाईन : पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. उद्या (२८ जून) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, ईडीच्या समन्सवर संजय राऊत यांनी ट्विट करत मला अटक करा, असे आव्हान दिले आहे. ”मला आताच समजले ED ने मला समन्स पाठवले आहे. छान, महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!,” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी हे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

गोरेगावातील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात विक्रीसाठी बांधण्यात येत असलेल्या प्रस्तावित मेडोज इमारतीमध्ये 100 हून अधिक फ्लॅट बनावट पद्धतीने बुक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या तपासात समोर आली होती. या प्रकल्पाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे.

हाउसिंग डेव्हलपमेंट इफ्रास्ट्रक्चर लि. (एचडीआयएल) आणि पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत (पीएमसी) झालेल्या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या राकेशकुमार वाधवान आणि सारंगकुमार वाधवान कुटुंबियांसोबतच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र प्रवीण राऊत यांचा घोटाळ्यात सहभाग असल्याची ईडीला खात्री आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्यातील सुमारे 100 कोटी रुपये एचडीआयएलच्या माध्यमातून हडपल्याच्या आरोपाखाली ईडीने फेब्रुवारी महिन्यात प्रवीण राऊत अटक केली होती.

ईडीच्या तपासात काही खरेदीदारांचे पत्ते बनावट असल्याचे आढळून आले. विकासकाने नाममात्र रक्कम आकारून किंवा काहीच रक्कम न घेता डमी नावावर हे फ्लॅट बुक केल्याचे उघड झाल्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार्‍या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनकडे फ्लॅट बुक करणार्‍यांना ईडीने याआधी समन्स बजावले होते.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनसोबतचा करार रद्द करून म्हाडाने गोरेगावचा प्रकल्प ताब्यात घेतला असल्याने ईडीचा हा तपास महत्वाचा मानला जातो. म्हाडाच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने पत्राचाळचा पुनर्विकास करण्याच्या करारात फेरफार केला गेल्याचा ईडीला संशय आहे. 2010 मध्ये गुरू आशिष कंपनीच्या विकासकाने मीडोज इमारतीत फ्लॅट बुक करणार्‍यांकडून 138 कोटी रुपये वसूल केले. यापैकी काहींनी डमी नावाने तर, काहींनी केवळ नाममात्र रक्कम देत फ्लॅट बुक केले.

पत्राचाळ सोसायटी, म्हाडा आणि गुरु आशिष यांच्यातील त्रिपक्षीय कराराच्या माध्यमातून विकासकाने प्रत्येक भाडेकरूसाठी 775 चौरस फूट बिल्ट-अप एरिया फ्लॅट्स आणि 36 महिन्यांत म्हाडासाठी 3,000 पेक्षा जास्त फ्लॅट्स बांधायचे होते. त्यानंतर तो ही किंमत वसूल करण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी उर्वरित भूखंडावर खासगी इमारती बांधू शकणार होता. गुरू आशिषने प्लॉटचे वेगवेगळे भाग सात प्रभावशाली कंपन्या व प्रमुख बांधकाम व्यावसायिकांसह एफएसआयसह विकून 1 हजार 34 कोटी रुपये जमा केले आहेत.

प्रवीण राऊत हे वाधवान यांच्यासोबत गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीमध्ये संचालक होते. या कंपनीने 2006 मध्ये गोरेगावमधील पत्राचाळीचा पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. परंतु दिलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण झाला नाही. प्रकल्पातील बाधित 672 रहिवाशांना वार्‍यावर सोडत विकासकाने म्हाडासाठीचे अतिरिक्त गाळेही दिले नाहीत. अंतर्गत तपासणीत या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचे उघड होताच 2011 मध्ये म्हाडाने कारवाई सुरू केली. मार्च 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 2020 मध्ये एचडीआयएलचे सारंग वाधवान यांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. पुढे ईडीने हा गुन्हा तपासावर घेतला.

एचडीआयएलकडून 95 कोटी रुपये मिळाले. तर, गुरु आशिषने गोळा केलेले पैसे हे प्रकल्पाचे अर्धवट बांधकाम, समूह कंपन्यांच्या कर्जाची परतफेड आणि भाडेकरूंचे भाडे भरण्यासाठी वापरण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

 हे ही वाचा :

Back to top button