बंडखोर ४० आमदारांच्या बॉडी इथे येतील ; संजय राऊत | पुढारी

बंडखोर ४० आमदारांच्या बॉडी इथे येतील ; संजय राऊत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  बंडखोर 40 आमदारांच्या बॉडी इथे येतील आणि त्यांना डायरेक्ट शवागृहात पोस्टमार्टेमसाठी पाठवू… ते जिथे थांबले आहेत तेथे गुवाहाटीत कामाख्या देवीचे जागृत मंदिर आहे. तिथे रेड्याचे बळी दिले जातात. आम्ही तिकडे 40 रेडे पाठविले आहेत, त्यांचे बळी द्या, अशा भाषेत शिवसेना नेते संजय राऊत रविवारी बंडखोर आमदारांवर घसरले. त्यांच्या या टीकेने बंडखोर आणखी बिथरले असून या राऊतांना आता तरी आवरा, अशी मागणी त्यांनी शिवसेनेकडे केली
आहे.

बंडाच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने रविवारीही मुंबईत मेळावे घेतले. त्यापैकी दहिसरमधील मेळाव्यात संजय राऊत बंडखोरांवर नेहमीपेक्षा जास्त घसरले. राऊत म्हणाले, गुलाबराव पाटील हे पान टपरी चालवत होते. त्यांना शिवसेनेने मोठे केले. आता त्यांना पुन्हा पानटपरीवर बसवू. तो आमदार प्रकाश सुर्वे भाजी विकत होता. मी ऐकलेय की सडकी भाजी विकत होता. आता त्याच्यावर पुन्हा भाजी विकण्याची वेळ येईल. परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांचे तानाजी पण त्यांची कृती खोपड्यांची… पैठणचा संदिपान भुमरे साखर कारखान्यावर वॉचमन होता. मोरेश्‍वर सावेंचे तिकीट कापून त्याला बाळासाहेबांनी तिकीट दिले.

प्रताप सरनाईक सतत दिल्‍लीला आणि विचारले की म्हणायचे, माझी सुप्रीम कोर्टात केस आहे. त्यांच्या मागे किरीट सोमय्या लागले होते. तेही वॉशिंग मशिनमधून आता साफ होऊन निघाले. यशवंत जाधवांना तुरुंगात पाठवणार, असे सोमय्या म्हणत होते. ते जाधव नवरा-बायकोही वॉशिंग मशिनमधून साफ होऊन निघाले. असा एकेकाचा समाचार घेत राऊत म्हणाले, हिंमत असेल आणि एका बापाचे असाल तर शिवसेनेच्या तिकिटावर मिळवलेल्या आमदारकीचे राजीनामे द्या आणि निवडून यऊन दाखवा.

बंडखोरांमध्ये पडसाद

संजय राऊत यांना आवरा, असे आवाहन करतानाच बंडखोर आमदारांचे प्रवक्‍ते दीपक केसरकर म्हणाले, राऊतांनी शिवसेनेचे मित्र संपवले. राऊत यांनी म्हटलेले ‘एका बापाचे असाल तर…’ हे वाक्यही आक्षेपार्ह असून हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. याचा अर्थ काय होतो. हे शिवसेनेला चालते का? असा सवालही केसरकर यांनी केला. असा प्रवक्‍ता कुणालाही मिळू नये, अशी खोचक प्रार्थनाही केसरकर यांनी केली.

चार वेळा शिवसेना फोडणार्‍या राष्ट्रवादीसोबत जाण्यास राऊत यांनी शिवसेनेला भाग पाडले. तसेच हा पान टपरीवर जाईल, तो रिक्षा चालवेल, हा भाजी विकेल… असे राऊतांनी म्हटल्यानंतर आमदारांच्या डोळ्यांत पाणी आले. कुठे ते प्रेमाने पाठीवर हात फिरवणारे बाळासाहेब आणि कुठे हे, अशा शब्दांत केसरकर यांनी नाराजी व्यक्‍त केली. याच पाणी टपरीवाल्याने, भाजी विक्रेत्याने शिवसेना मोठी केली. एक आमदार तर लग्‍नाच्या आदल्या रात्रीपर्यंत तुरुंगात होता. त्याची सुटका झाली नाही तर त्याच्या फोटोसोबत मुलीचे लग्‍न लावून देण्याचे सासर्‍याने ठरवले होते. अशा लोकांनी शिवसेना उभी केली आहे. अशा लोकांविरोधात राऊत घाणेरडे शब्द वापरत आहेत, असे केसरकर म्हणाले.

ज्यांनी राऊतांना राज्यसभेसाठी निवडून दिले. त्यांच्याबद्दलच राऊत असे बोलत आहेत. त्यांनी आधी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर अशी वक्‍तव्ये करावीत. आमचा संयम तुटायची वाट बघू नका, असा इशाराही केसरकर यांनी दिला.?

खैरेंना बंडखोर आमदाराचा फोन
‘संजय राऊत यांना आवरा’ असा फोन शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना गुवाहाटीतून एका बंडखोर आमदाराने केला. तुम्ही मध्यस्थी करा, असे साकडेही या आमदाराने खैरे यांना घातले. एका वाहिनीशी बोलत असतानाच या बंडखोर आमदाराचा फोन खैरे यांना आला. तो त्यांनी सर्वांना ऐकून दाखवला.

एकनाथ शिंदे यांचे दोन ट्विट
* मुंबईत बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणार्‍या, दाऊदशी थेट संबंध असणार्‍यांना हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? यालाच विरोध म्हणून उचललेले हे पाऊल आहे. आता ते आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.

* हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आले तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचे भाग्य समजू.

Back to top button