मनसे काय 'ते' 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतात; संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल | पुढारी

मनसे काय 'ते' 'एमआयएम'मध्येही जाऊ शकतात; संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदार संजय राऊत यांच्या व्हिडिओ ट्विटमुळे महाराष्ट्राचे राजकारण आणखी तापले आहे. शिंदे गटातील आमदारांच्या जुन्या भाषणावर बोट ठेवत राऊतांनी बंडखोर आमदारांवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच मनसे आणि शिंदे यांच्यातील कथित चर्चेवर प्रतिक्रिया देत त्यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. मनसे काय ते एमआयएममध्येही जाऊ शकतात, असा खोचक टोमणा राऊत माध्यमांशी बोलताना दिला.

काही तासांपूर्वी संजय राऊत यांनी एक जुना व्हिडिओ ट्विट केला आहे. त्या व्हिडिओला संजय राऊत यांनी ”बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा..श्रीमान केसरकर. थोडा संयम ठेवा. डोंगर झाडी निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!” अशी कॅप्शन लिहिलीय.

गुवाहाटीत बसलेल्यांसाठी आपण ट्विट केल्याचं संजय राऊत म्हणाले. ते म्हणाले, आत्मा मेला की मृतदेह उरतो, कालच्या टीकेवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. गुवाहाटीत बसलेले सगळे आमच्या जवळचे आहेत. कायद्याची लढाई सुरू झाली आहे. आसाममध्ये का बसलात, मुंबईत येऊन बोला, असे आव्हानही राऊतांनी दिले.

राऊत पुढे म्हणाले, रस्त्यावरची आणि कायद्याची लढाई सुरू आहे. महाराष्ट्रात राज्याचे पोलिस सुरक्षा करण्यास समर्थ आहेत. राज्यातही झाडी, डोंगर, हॉटेल आहेत. आत्मा मेलेल्यांकडून निष्ठेची अपेक्षा कशी ठेवायची, अशी टीका एकनाथ शिंदेचं नाव न घेता संजय राऊत यांनी केली.

शिंदे गटाची भूमिका महाराष्ट्राला पटणार नाही. गुवाहाटीतील हॉटेलच्या दरवाजा, खिडक्या उघडा. सत्य परिस्थिती काय आहे, सत्य जाणून घेऊया. मतं ईडी नव्हे तर जनता देणार, महाराष्ट्राची माती जनतेला माफ करणार नाही, असेही राऊत यांनी नमूद कले.

Back to top button