वेळ पडली तर दांडा हातात घ्यावा लागेल; संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल | पुढारी

वेळ पडली तर दांडा हातात घ्यावा लागेल; संजय राऊतांचा बंडखोरांवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेळ पडली तर झेंडा खिशात ठेऊन दांडा हातात घ्यावा लागेल. आम्ही कधीही गुडघे टेकलेले नाहीत. आम्ही गटाचे नाही, तर बाळासाहेबांचे नाव सांगतो, अशा शब्दांत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर हल्लाबाेल केला. ते दहिसर येथे शिवसेनेच्या मेळाव्यात आज (दि.२६) बोलत होते.

राऊत म्हणाले की, शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहटीत जाऊन बसले आहेत. यामागे मोठे कटकारस्थान आहे. महाराष्ट्राविरोधात फार मोठे कारस्थान रचले जात आहे. त्यांना महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे आहेत. त्यांना शिवसेना तोडायची आहे,असा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा खरपूस समाचार घेतला. बंड केलेल्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा विजयी होऊन दाखवावे, असे आव्हान त्यांना आमदारांना दिले. प्रकाश सुर्वे यांना पुन्हा भाजी विकावी लागणार आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा पानटपरीवर जावे लागेल. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना मुंबई माहीत होती का ? त्यांना शिवसेनेने आमदार केले. औरंगाबादमधील शिवसेनेचे बंडखोर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना हिंदुत्वाचे काय देणे लागते, असा सवाल करत हिंदूत्वासाठी बंडखोरी केल्याच्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली.

आसाममध्ये चाळीस रेडे पाठवले आहेत. तेथील कामाक्षी मंदिरात रेड्यांचे बळी दिले जातात. तेथे गेलेल्या ४० आमदारांचा बळी दिला जाणार असल्याची खोचक टीका त्यांनी केली. ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या. शिवसेनेवर काही फरक पडणार नाही. भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या आता काय करणार ? ईडीचे भीती दाखवून आमदारांना फितवले. आता त्यांना कोणत्या मशीनमधून धुवून घेणार ? असा प्रश्नही त्यांनी भाजपला केला. आगामी राज्यातील महापालिका निवडणुकां जिंकल्या तर हे ४० चोर कायमचे मातीत गाडले जातील, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button