गुवाहाटीतल्या ‘झाडी, डोंगार, हाटील’चं कौतुक करणा-या शहाजीबापूंना संजय राऊतांचा ‘ठाकरी’ टोला, म्हणाले… | पुढारी

गुवाहाटीतल्या ‘झाडी, डोंगार, हाटील’चं कौतुक करणा-या शहाजीबापूंना संजय राऊतांचा ‘ठाकरी’ टोला, म्हणाले...

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची एक कथीत ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शहाजीबापूंचा कार्यकर्त्यासोबत झालेला हा संवाद मजेशीर आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते त्यांच्या नेहमीच्या गावरान स्टाईलमध्ये बोलताना दिसतात. यावेळी त्यांनी म्हटलेले, “काय झाडी… काय डोंगर… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा शब्द धरून नेटकऱ्यांनी देखील काही मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आमदार शहाजीबापूंच्या त्या मजेशीर विधानाचा कडक भाषेत समाचार घेत महाराष्ट्र मे श्मशान है क्या? असे म्हणत टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पुन्हा समाचार घेतला. ते म्हणाले की, आता बंडखोरांमध्येही फूट पडणार आहे, काही आमदारांशी संपर्क झाला आहे. त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाऊ शकते, असे संकेत दिले.

शिवसेनेची युवा शाखा ‘युवासेना’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. दादर येथील शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. कालच संजय राऊत यांनी शिवसेनेच्या 7 बंडखोर मंत्र्यांना पदावरून हटवण्याचे संकेत दिले होते.

शिवसैनिकांची आज पुन्हा हिंसक निदर्शने

दरम्यान, पुण्यात आज (दि. २६) सकाळी शिवसैनिकांनी हिंसक निदर्शने केली. पुण्यात शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवर चप्पल मारून ते पोस्टर फाडले आणि निषेध व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत आणि बंडखोर आमदारांच्या कार्यालयात तोडफोड, दगडफेक, पोस्टर फाडणे, त्यांचे फोटो जाळून टाकणे अशा कारवाया करत आहेत. अशातच ठाणे पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. काल मुंबई पोलिसांनीही १० जुलैपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. दरम्यान, ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकाच ठिकाणी जमू शकणार नाहीत.

शहाजीबापू यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

‘आमचं सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार’, असे गुपित सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी फोडले आहे. त्यांची ही क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पाटील यांच्या एका कार्यकर्त्याने त्यांना फोन करून आपण कुठे आहात, अशी विचारणा केली असता शहाजी पाटील म्हणाले की, मी गुवाहाटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करू नका, असा नेत्यांचा आदेश होता. त्यामुळे कुणाला फोन केला नाही, असे त्यांनी कार्यकर्त्याला समजावून सांगितले.

एकनाथ शिंदे न बोलता रिझल्ट देणारा माणूस

एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत. पण त्यांचे रिझल्ट करेक्ट आहेत. मला हे नेतृत्व खूप आवडले आहे. आपली ओळख नाही पाळख नाही तरीपण त्यांनी माझी विचारपूस केल्याचे पाटील यांनी सांगितले. तुम्ही गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, तुम्ही काही पण काम सांगा, असे शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे तर देव माणूस

एकही आमदार उद्धव साहेबांच्या विरोधात नाही. त्यांना देव माणूस मानत आहेत, असेही सांगायला शहाजी पाटील विसरले नाहीत. गेल्या अडीच वर्षांत सांगोला उपसा सिंचन योजनेला आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशा मागणीची बारा पत्रे उद्धव ठाकरे यांना दिली असतानाही त्यांनी नाव काही दिले नाही, अशी नाराजी शहाजी पाटील यांनी व्यक्‍त केली. तसेच अजित पवार यांनी निधी देताना कसा अन्याय केला हे देखील त्यांनी या संभाषणात सांगितले आहे. शिंदे यांच्या गटामध्ये शंभूराज देसाई आणि मी पहिल्यांदा गेलो. मग बाकीचे आमदार आले, असाही खुलासा पाटील यांनी केला आहे.

Back to top button