Ajit Pawar : पुढची रणनीती ठरविण्यासाठी अजित पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Ajit Pawar : पुढची रणनीती ठरविण्यासाठी अजित पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील सध्याच्या सर्व राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेणार घेणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते (Ajit Pawar) म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत राज्यातील पेचप्रसंगावर मार्ग काढण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात येईल. तसेच पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, गेलेले आमदार शिवसेनेचे आहेत, मग सरकार अल्पमतात कसे म्हणता येईल, असाही सवालही अजित पवार यांनी यावेळी केला. सरकार बहुमतात असून विधीमंडळाबाबतचा निर्णय अध्यक्ष घेतील, असे पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी रहायचं आणि सरकार टिकवायचं ही काल आणि पुढेपण पक्षाची भूमिका राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी ६.३० वाजता मातोश्रीवर जाऊन पवारसाहेब, खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे आम्ही भेट घेणार असून जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे याबाबत चर्चा करणार असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विधीमंडळाचे जे काही कामकाज आहे त्याबद्दलचा निर्णय विधानमंडळाचे अध्यक्ष घेतील कारण त्यामध्ये सरकार म्हणून बोलण्याचा डीचाही अधिकार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गुवाहटीला जे आमदार गेले आहेत ते शिवसेनेचे आहोत असे सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून बहुमत आहेच. शिवाय ते शिवसेनेचे आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच आहेत, असेही अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

दरम्यान, शिवसेना भवनात आज शिवेसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी शिवसेना पदाधिका-यांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी राज्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत भाजपने डाव साधल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भाजपसोबत जायला काहींचा दबाव आहे. शिवसेनेशी बंडखोरी केलेले आणि आपल्याला सोडून जे गेले ते माझे कधीच नव्हते. शिवसेनेची मुळं माझ्या सोबत आहेत. मला सत्तेचा मोह नाही. मी मुख्यमंत्री पद आताही सोडायला तयार आहे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, मी शांत आहे. षंढ नाही. स्वप्नात देखील विचार केला नव्हता की शिवसेनेचे आमदार बंड करून पाठीवर वार करतील. काही आमदारांनी धोका दिला. वर्षा निवासस्थान सोडलं म्हणजे मी जिद्द सोडली असं होत नाही. माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडावरची फुलं, फांद्या नेली तरी त्याचे मूळं मात्र नेऊ शकत नाही. ती मूळं नेहमीच माझ्यासोबत असतील. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट वाटत नाही. काही चर्चा अशाही सुरू आहेत की, हा मास्टर प्लॅन आहे. पण आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन?, असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news