जालना: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जोरदार झटका देत जालना सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. जालना जिल्ह्यातील सावरगाव हडत येथील जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, कारखान्याची इमारत, प्लांट आणि कारखान्याची यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.
अर्जुन खोतकर यांच्या रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्री व्यवहारात शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने खोतकर यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. याशिवाय जालना कारखाना, बाजार समितीच्या जागेची पाहणी केली होती. जवळपास अठरा तास ईडीने खोतकर यांची प्राथमिक चौकशी त्यावेळी केली होती. त्यानंतर हे प्रकरण थंड झाले की काय असे वाटत असतानाच ईडीने कारखान्याची मालमत्ता जप्त केली. याबाबतच अधिक तपशील मिळू शकला नाही.
दरम्यान, १९८४ मध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब पवार यांनी या कारखान्याची उभारणी केली होती. कारखाना तोट्यात गेल्यानंतर राज्य सहकारी बँकेने कारखाना लिलावात काढला. तेव्हा खोतकर यांनी औरंगाबादेतील दोन उद्योजकांना हा कारखाना विकला. परंतु त्याचे व्यवहार अर्जुन शुगर्समधून झाले होते. या तिघांनी आर्थिक व्यवहार करताना शासनाची फसवणूक केली, अशी तक्रार होती.
या कारखान्याच्या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची पहिली तक्रार कामगार नेते काँ. माणिक जाधव यांनी केली होती. अण्णा हजारे, मेधा पाटकर यांनीही कारखान्याचे प्रकरण उचलून धरले होते. तर किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि ईडीकडे तक्रार केली. त्याआधारे २७ नोव्हेंबर, २०२१ रोजी ईडीचे पथक जालन्यात आले होते. तेव्हा खोतकर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते.
दरम्यान, ईडीच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंबंधातील ट्विट केले आहे. त्यात जालन्याजवळ असणार्या या कारखान्याची जमीन, इमारत, यंत्रसामुग्री ईडीने सील केल्याचे म्हटले आहे. राज्य सहकारी बँकेने केलेल्या लिलाव प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने नमूद केले आहे.
हेही वाचलंत का ?