मुख्यमंत्री ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांना धमकी; मागण्या मान्य न केल्यास... | पुढारी

मुख्यमंत्री ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांना धमकी; मागण्या मान्य न केल्यास...

मुंबई, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्स ॲपवर मेसेज पाठवून त्यांना धमकी दिली आहे.

याप्रकरणी नार्वेकर यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे.

अज्ञात व्यक्तीकडून नार्वेकर यांना मेसेज आला असून काही मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण केल्या नाहीत तर तुमच्या मागे ईडी लावू अशी धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद नार्वेकर यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअप मेसेज पाठवला आहे.

त्यात त्याने आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे.

आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी दिली आहे.

दरम्यान या मागण्यांसंबधी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

नार्वेकर हे शिवसेनेतील बडे प्रस्थ मानले जाते. तसेच ठाकरे यांचे नीकटवर्तीय मानले जातात.

नार्वेकर हे बराच काळ उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आहेत. नव्या फेरबदलांमध्ये त्यांना शिवसेनेचे सचिव केले आहे.

ठाकरे यांचे विश्वासी आणि नीकटवर्तीय असलेल्या नार्वेकर यांचे पक्षात वजन आहे.

थेट मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनाच अशा पद्धतीने धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी याप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करणार आहे.

विरोधकांमागे केंद्रीय तपास संस्था

सध्या राज्यात ईडी चा मोठा बोलबाला आहे. राज्यातील विविध संस्था आणि विरोधी पक्षातील व्यक्तींमागे ईडीचा ससेमिरा आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, बीड जिल्हा मध्यवर्ती बँके, रोहिणी खडसे आणि अन्य संस्थांची चौकशी ईडी करत आहे.

त्यामुळे केवळ राजकीय आकसापोटी केंद्रीय तपास संस्थांकडे तपास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे.

त्यात नार्वेकर यांना धमकी आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Back to top button