प्यादे होऊ नका; संजय राऊत यांचा राज्यपाल कोश्यारी यांना सल्ला | पुढारी

प्यादे होऊ नका; संजय राऊत यांचा राज्यपाल कोश्यारी यांना सल्ला

मुंबई, पुढारी ऑनलाईन: राज्यपाल कोश्यारी यांनी कुणाच्या हातचे प्यादे होऊ नये, त्यांनी घटनात्मक पदाचा मान राखावा, असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

राज्यपाल नामनिर्देशित १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारशींव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य विनाविलंब पार पाडावे,

असा सल्ला दिला आहे. यावर राऊत यांनी राज्यपालांना प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सल्ला दिला.

कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राऊत प्रसारमाध्यामांशी बोलत होते. ‘घटनात्मक पेचप्रसंग राज्यपालांकडून निर्माण होऊ नये असे कोर्टाने म्हटले आहे. राज्यपालांनी स्वत:ला राजकीय प्यादे म्हणून वापरायला देऊ नये.

ते पूर्वाश्रमीचे भाजपाचे नेते किंवा संघाचे प्रचारक असू शकतात. त्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. पण राज्यघटनेनुसार राज्यांच्या अधिकारांवर, कॅबिनेटच्या अधिकारांवर अतिक्रमण करत असतील तर हे संघराज्यावर हल्ला आहे,’

राज्यपाल प्रेमळ पण भूमिका राजकीय

राऊत पुढे म्हणाले, ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रेमळ आहेत. मी त्यांना ओळखतो.

त्यांच्यासोबत मी काम केले आहे. पण ज्याप्रकारे १२ आमदारांसंदर्भात त्यांनी भूमिका घेतली आहे ती राजकीय आहे.

ते मनापासून हे करत नसावेत. पण शेवटी त्यांची नेमणूक ज्या पक्षाकडून झाली आहे.

त्या पक्षाच्या भूमिकेला, दबावाला अनुसरुन काम करत आहेत.  खरं तर त्यांनी दबाव झुगारुन एक स्वाभिमानी बाण्याचे, घटनेचे रखवालदार असल्याची भूमिका घेतली पाहिजे.’

हे तर पदाचं अवमूल्यन आणि अवहेलना

‘राजभवनात बसलेल्या व्यक्तीने स्वत:ला राजकीय प्यादे म्हणून वापरु देऊ नये.

यामुळे घटनात्मक पदाचं अवमूल्यन आणि अवहेलना होत आहे. हायकोर्टाने प्रत्यक्ष सल्ला दिला नसला तरी अप्रत्यक्ष हेच सांगितलं आहे.’

Back to top button