विलासराव देशमुख यांनाही सहन करावा लागला होता पराभवाचा धक्का
पुढारी ऑनलाईन डेस्क: आपल्या खास भाषण शैली आणि व्यक्तिमत्वाने देशाच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या विलासराव देशमुख यांनी अनेक पदे भूषविली. सर्वच पक्षांत मित्र असलेल्या विलासरावांना मात्र, १९९५ च्या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. विलासराव त्यावेळी पक्षातील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्त जाणून घेवूया विलासराव देशमुख यांचा राजकीय प्रवासाविषयी.
वयाच्या २९ व्या वर्षी बाभळगावचे सरपंच झालेले विलासराव राजकीय जीवनात एकेक पायरी चढत गेले.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सदस्य, लातूर पंचायत समितीचे सदस्य, त्यानंतर जिल्हा बँकेचे संचालक, राज्य बॅकेचे संचालक अशी पदे त्यांनी भूषविली.
त्यांनी १९९० मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर ते १९९५ पयंत आमदार होते.
आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. विलासराव १८ ऑक्टोंबर १९९९ रोजी मुख्यमंत्री झाले.
त्यानंतर राजकीय उलथापालथीत २००३ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांना संधी दिल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले.
पुढे निवडणुका झाल्या आणि सत्ता आल्यानंतर विलासराव देशमुख यांनाच पक्षाने संधी दिली. २००८ पर्यंत विलासराव मुख्यमंत्री होते.
पराभवाची धूळ चाखावी लागली
१९८० मध्ये आमदार झालेल्या विलासरावांनी आपल्या राजकीय जीवनात नेहमीच चढती कमान ठेवली. विलासराव हे महाराष्ट्र काँग्रेसमधील बडे नाव झाले.
ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील उमेदवार होते. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर पी. व्ही. नरसिंगराव यांनी शरद पवार यांना राज्यात पाठविले होते. पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच पकड निर्माण केली होती.
त्यात विलासरावांचा गट प्रबळ झाला होता. हे एकप्रकारे शरद पवार यांना आव्हानच होते.
अशात मुबंई बॉम्बस्फोट आणि दंगलींमुळे महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहू लागले होते.
मुंबईत बाळासाहेब ठाकरे आणि ग्रामीण महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांनी रान उठवले होते.
यामुळे राजकीय बदलाचे वारे वाहू लागले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाले आणि राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले.
काँग्रेसमधील अनेक दिग्गजांना त्यावेळी पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. त्यात विलासराव देशमुखही होते.
विलासरावांसाठी हा मोठा धक्का होता. ते काँग्रेसमधील मोठे प्रस्थ होते. तरीही त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
असे म्हणतात की, काँग्रेसमधील शरद पवारांचे विरोधक त्यावेळी ओळीने पराभूत झाले होते.
हा जनतेचा रोष होता की पक्षांतर्गत कुरघोड्या होत्या याचे अनेकजण आपल्या परीने विश्लेषण करतात. मात्र, हा पराभव मोठा होता.
पराभव केलेल्या कव्हेकरांनाच आणले पक्षात
विलासराव देशमुख हे राजकारणातील जिंदादील व्यक्तिमत्व होते. त्यांचा स्वभाव हेच त्यांच्या यशाचे गमक होते. त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांनाही आपलेसे केले.
ज्या शिवाजीराव कव्हेकरांनी त्यांचा १९९५ च्या निवडणुकीत पराभव केला त्यांनाच पुढे पक्षात आणले.
पराभव केल्यापासून देशमुख आणि कव्हेकर हे कट्टर विरोधक होते. त्यांचे फारसे जमत नव्हते.
कव्हेकर भाजपमध्ये होते आणि २००९ ला लातूर ग्रामीण मतदारसंघातून अमित देशमुख यांना उमेदवारी मिळाली.
त्यावेळी कव्हेकर यांच्या घरी जाऊन विलासरावांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
पुढे काही दिवसांत कव्हेकर यांनी विलासरावांचे नेतृत्व मान्य करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१२ मध्ये विलासरावांचे निधन झाले आणि कव्हेकर आणि देशमुख कुटुंबातील संवाद कमी झाला.
२०१४ च्या निवडणुकीत पुन्हा कव्हेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली नाही त्यामुळे ते नाराज झाले. पुढे ते भाजपमध्ये गेले मात्र विलासरावांनी जय पराजयापलिकडे राजकीय कारकीर्दीत मुत्सदेगिरी काय असते हे दाखवून दिले हाेते.
पुत्रप्रेमापोटी सोडावे लागले होते मुख्यमंत्रिपद
२००८ मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्याची पाहणी करण्यासाठी विलासराव देशमुख गेले.
त्यांनी पाहणी केली. वरवर पाहता हा सरकारी कार्यक्रम होता. मात्र या पाहणीचे फुटेज टीव्ही चॅनेलवर दिसू लागले आणि एकच गदारोळ उठला.
विलासरावांबरोबर त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख आणि चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे दोघे सोबत होते. देशभर या हल्ल्यामुळे संताप व्यक्त केला जात असताना देशमुख यांना पुत्रप्रेमाचा मोह आवरला नाही.
एकूणच ते या हल्ल्याबाबत गंभीर नाहीत, असा आरोप केला गेला आणि त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले.
राजकीय वारसदाराशी खटके
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर त्यांच्या जागी विलासरावांच्या संमतीने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले.
नवखे असलेले अशोक चव्हाण विलासराव देशमुख यांच्या छायेखाली काम करतील असे वाटत होते.
मात्र, त्यांनी स्वतंत्र कारभार करत विलासरावांना धक्के देण्यास सुरुवात केली. त्यातून या दोघांतील दरी रुंदावत गेली.
पुढे आदर्श घरकुल घोटाळा प्रकरण बाहेर आले आणि अशोक चव्हाण यांनाही सत्ता सोडावी लागली.
हेही वाचा:

