… तर महामार्गांची कामे मंजूर करण्‍याबाबत विचार करावा लागेल : नितीन गडकरी | पुढारी

... तर महामार्गांची कामे मंजूर करण्‍याबाबत विचार करावा लागेल : नितीन गडकरी

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन: राज्‍यातील महामार्गांच्‍या कामात अडथळे येत असल्‍याचे तक्रार केंद्रीय रस्‍ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍याकडे केली आहे. नितीन गडकरी यांच्‍या ‘तक्रार’ पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गडकरी यांनी आपल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, राष्‍ट्रीय महामार्गांच्‍या तीन ठिकाणच्‍या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळा आणत आहेत. या अडथळ्यांमुळे येथील काम बंद पडण्‍याची शक्‍यता आहे. यापुढे कामे सुरु ठेवावीत का, याचा विचार संबंधित विभाग करत आहे. अर्धवट कामे झालेल्‍या रस्‍त्‍यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढेल, असेही त्‍यांनी या पत्रात स्‍पष्‍ट केले आहे.

वाशिम शहराच्‍या १२ किलोमीटर बायपास रस्‍त्‍याच्‍या कामाला शिवसेनेच्‍या लोकप्रतिनिधी विरोध केला आहे.

मालेगाव-रिसोड राष्‍ट्रीय महामार्गांवरील पैनगंगा नदीवरील पुलाचे काम करताना संबंधितांना धमक्‍या दिल्‍या जात आहेत.

वाशिम जिल्‍ह्यातीलच सेलू बाजार गावातून जाणार्‍या राष्‍ट्रीय महामार्गाचे काम शिवसेनेच्‍या कार्यकर्त्यांनी थांबवले आहे. हे काम बंद करण्‍यासाठी साधनसामुग्रीची जाळपोळ झाली असून हा अत्‍यंत गंभीर प्रकार आहे.

त्‍यामुळे यापुढे राज्‍यातील राष्‍ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्‍याबााबत विचार करावा लागेल, असा इशाराही गडकरी यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

गडकरी यांच्‍या तक्रार पत्राची मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्‍यांनी पोलिस महासंचालकांनाच आदेश दिले आहेत.

संबंधित रस्‍त्‍यांच्‍या कत्राटदारांनी लोकप्रतिनिधींविरोधात केलेल्‍या तक्रार अर्जाची माहिती देण्‍याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिस महासंचालकांना दिले आहेत.

हेही वाचल का? 

पाहा व्‍हिडीओ : नागपंचमी स्पेशल : आरेच्या जंगलात साप एक थ्रिलिंग अनुभव !

 

 

 

Back to top button