नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: बलाकारानंतर खून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या पालकांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट दिली होती. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरुन तो फोटो शेअर केला होता. यावरुन ते वादाच्या भोवर्या सापडले होते. त्यांचे ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आले होते. मात्र शनिवारी पुन्हा एकदा हे अकाउंट अनलॉक करण्यात आले आहे.
पीडितेच्या पालकांबरोबरील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तीव्र आक्षेप घेतला. ट्विटरला संबंधितांवर कारवाईची मागणी केली. तसेच फेसबुकलाही राहुल गांधींच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी केली. यानंतर राहुल गांधींसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह ५ हजार ट्विटर अकाउंट लॉक करण्यात आली होती.
या कारवाईला राहुल गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. ट्विटरचे धोरण पक्षपाती आहे. केंद्र सरकारच्या आदेशाने अमेरिकेची कंपनी राजकीय प्रक्रियेमध्ये दखल देत आहे. ट्विटरने केलेली कारवाई ही भारतीय लोकशाहीवर हल्ला आहे. एक राजकीय नेता म्हणून केवळ माझ्यावर हल्ला नाही तर माझे १९ ते २० दक्षलक्ष फॉलोअर्स यांनाही आपले विचार व्यक्त करण्यापासून रोखण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले होते.
ट्विटरने काँग्रेसवर कारवाई करुन कंपनी पारदर्शी नसल्याचे स्पष्ट केले आहे. याचा वापर करणार्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. राजकीय संघर्षात एका पक्षाची बाजू घेणे ट्विटरवर नकारात्मक परिणाम करणारे ठरणार आहे. तसेच हे पक्षपाती धोरण राबविणारी कंपनीला राजकीय भूमिका निश्चित करण्याचा अधिकार आपण देणार आहे का, असा सवालही त्यांनी केला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले टिवटर इंडियाचे सीईओ मनीष माहेश्वरी यांना भारतातून हटविण्यात आले आहे. ते आता अमेरिकेत कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहेत.
राहुल यांचे अकाउंटवर बंदी घालण्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होते. या गदारोळात मनीष माहेश्वरी यांची बदली करण्यात आली.
आता मनीष माहेश्वरी आता सॅन फ्रॅन्सिस्को येथे रेव्हेन्यू आणि स्ट्रॅटेजी विभागाचे सीनिअर डायरेक्टर म्हणून काम पाहणार आहेत.
मनीष माहेश्वरी यांची बदली झाल्यानंतर आता टि्वटर इंडियाची जबाबदारी कोण सांभाळणार याकडे लक्ष लागले होते.
विद्यमान सेल्स हेड कनिका मित्तल आणि विद्यमान बिजनेस हेड नेहा शर्मा या दोन अधिकाऱ्यांवर ट्विटर इंडियाची जबाबदारी असेल.
या दोघी जपानच्या व्हाईस प्रेसिडेंट सासामोटो यांना रिपोर्टिंग करतील.
हेही वाचलं का?