पुणे : पुढारी वृत्तसेवा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली. त्यांचे मारेकरी सापडले आहेत. मात्र, सूत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहेत. त्यांना कधी पकडणार, असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी केला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त 'अंधश्रद्धा निर्मूलन विचार संमेलन व डॉ. दाभोलकर विचार जागर सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, मारेकरी सापडूनसुद्धा सूत्रधार सापडणार नसतील तर देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्तीला आणि जीवाला असलेला धोका संपणार नाही.
डॉ. दाभोलकर विचार जागर सप्ताह 14 ते 20 ऑगस्टदरम्यान रोज सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन होणार आहे. त्यात शनिवारी 14 ऑगस्टला 'अंध रूढींच्या बेड्या तोडा' अभियानात नंदिनी जाधव यांची जाहीर मुलाखत होणार आहे. सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री मुक्ता बर्वे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गुरुवारी 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 यादरम्यान डॉ. दाभोलकर विचार संमेलन होणार आहे. या प्रसंगी डॉ. शैलाताई दाभोलकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, विनोद शिरसाठ, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, डॅनियल मस्कारेन्हस उपस्थित राहणार आहेत.