मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क
अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर फरार असलेले मनसे नेते संदीप देशपांडे आज शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर उपस्थित झाले. सरकारने दबाव आणला, आमची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला. पण, आमचा कायद्यावर आणि न्यायालयावर विश्वास आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
संदीप देशपांडे पत्रकार परिषदेत म्हणाले, खोट्या गुन्ह्याच्या आधारे पोलिस शोधत होते. महिलेला धक्का लागल्याचं दाखवलं तर मी राजकारण सोडेन. राज्यातलं राजकारण कोणत्या दिशेने चाललंय. ठाकरे सरकारकडून सुडाचं राजकारण केलं जातंय. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडेंनी सरकारवर निशाणा साधला. माझा धक्का महिलेला लागला नाही.
मुंबई सत्र न्यायालयाने मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन काल गुरुवारी मंजूर केला. मनसे आंदोलनाच्या दिवशी पोलिसांना चकवा देत हे दोघेही शिवाजी पार्क परिसरातून पळून गेले होते. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे संदीप देशपांडेंना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर लगेच ते आज शुक्रवारी माध्यमांसमोर आले.
या दोघांनाही अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यावर दोन वेळा सुनावणी करण्यात आली. यानंतर काही अटी आणि शर्थींच्या आधारे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दर महिन्याच्या १ आणि २३ तारखेला त्यांना शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार आहे. मुंबई सोडायच्या आधी त्यांना तपास अधिकाऱ्यांना सर्व माहिती द्यावी लागेल. संबंधित साक्षीदार, तक्रारदारांशी कोणताही संपर्क ठेवायचा नाही. अशा अटींवरती हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढल्यावर या दरम्यान झालेल्या झटापटीत एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. यानंतर या मनसे नेत्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आता जामीन अर्ज मंजूर झाल्यामुळे देशपांडे आणि धुरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.