कोरोनात रुग्णवाहिकेचे भोंगे ऐकू यायचे, आता इतरांचे भोंगे ऐकू येताहेत : उद्धव ठाकरे | पुढारी

कोरोनात रुग्णवाहिकेचे भोंगे ऐकू यायचे, आता इतरांचे भोंगे ऐकू येताहेत : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोरोना काळात रुग्णवाहिकेचे भोंगे ऐकू यायचे, आता बाकीचे भोंगे ऐकू येत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नामोल्लेख टाळून आज (सोमवार) येथे केली. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या कोरोना काळातील कामगिरीवरील कोविड वॉरियर या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोना काळातील उपाययोजनांवर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. कोरोना काळात गेलेल्या कामगिरीवर टीका करणाऱ्या काही जणांना कोविड वॉरियर पुस्तकाच्या प्रती मोफत वाटण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले.

आयुक्त चहल यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. त्य़ाचबरोबर कोरोना काळात सामोरे जावे लागलेल्या संकटांची उजळणीही या पुस्तकांतून होत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आपल्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे मोठे दडपण होते, असेही ते म्हणाले. लॉकडाऊन लागू केल्यानंतर मजुरांचे झालेले स्थलांतर ही एक कटू आठवण राहिली आहे. कोरोना काळात केंद्र सरकारकडून योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले नाही, अशी खंतही ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.

कोरोना काळात ऑक्सिजन मिळवताना आयुक्त चहल यांची मोठी कसरत होत होती. परंतु यावर त्यांनी योग्य उपाययोजना आखून मार्ग काढला. कोरोना नियंत्रणात आणणारा धारावी पॅटर्न देशभर पोहोचला. कोरोना काळात आयुक्त चहल यांची कामगिरी उल्लेखनीय अशी राहिली, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, लेखक मिनाझ मर्चंट यांनी कोविड वॉरियर पुस्तकाचे शब्दांकन केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button