Split in BKU : शेतकरी आंदोलनावेळीच लिहिली गेली होती टिकैत बंधूंच्‍या हकालपट्टीची 'स्क्रिप्ट' | पुढारी

Split in BKU : शेतकरी आंदोलनावेळीच लिहिली गेली होती टिकैत बंधूंच्‍या हकालपट्टीची 'स्क्रिप्ट'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

मागील वर्षी कृषी कायद्‍यांविरोधात दिल्‍लीच्‍या सीमेवर शेतकर्‍यांनी अभूतपूर्व असे आंदोलन केलं. प्रदीर्घ काळ चालेल्‍या या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. याच आंदोलनामुळे भारतीय किसान युनियनच्‍या ( भाकियु ) माध्‍यमातून शेतकर्‍यांच्‍या ऐक्‍याची वज्रमूठही केंद्र सरकारने अनुभवली. या आंदोलनाचे प्रमुख चेहरा असणारे राकेश टिकैत यांचीच काल ‘भाकियु’मधूनच हकालपट्टी झाली. आणि सर्वांच्‍या भुवया उंचावल्‍या. राकेश टिकैत त्‍यांचे बंधू नरेश टिकैत यांचीही अध्‍यक्षपदावरुन उचलबांगडी करण्‍यात आली आहे. आता अध्‍यक्षपदी राजेश चौहान यांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून, ही संघटनेतील माेठी फूट मानली जात आहे. वास्‍तविक हे होणार होतं कारण दिल्‍ली सीमेवर सुरु असणार्‍या शेतकरी आंदोलनावेळीच ‘भाकियु’मधून टिकैत बंधुची हकालपट्टीची स्क्रिप्ट लिहली गेली होती, अशी चर्चा आता संघटनेत होत आहे.

 Split in BKU : नेमके काय झालं ?

केंद्र सरकारच्‍या कृषी कायद्‍यांना विरोध करण्‍यासाठी ‘भाकियु’च्‍या नेतृत्‍वाखाली देशातील सर्वच शेतकरी संघटना एकवटल्‍या. यावेळी ‘भाकियु’मधील अधिकाराचे विकेंद्रीकरण झालंच नाही. संघटनेमधील पदाधिकार्‍यांच्‍या मतांना विचारातच घेतले गेले नाही. अध्‍यक्ष म्‍हणून नरेश टिकैत असेल तरी सर्व निर्णय प्रवक्‍तापदी असणारे राकेश टिकैतच घेत होते. टिकैत बंधु यांची मनमानी सुरु झाली आहे, असा सूर पदाधिकारी आंदोलनावेळीच लावत होते. मात्र हा आरोप टिकैत बंधू फेटाळत राहिले.

 Split in BKU : ‘भाकियु’ला पुन्‍हा मोठा धक्‍का

भारतीय किसान युनियन या संघटनेचे संस्‍थापक महेंद्र सिंह टिकैत यांचे २०११ मध्‍ये निधन झाले. यापूर्वीही आणि नंतरही युनियनमध्‍ये फूट पडली हाेती. भारतीय किसान युनियनमध्‍ये फूट पडूनच भानू, लोकशक्‍ती, महाशक्‍ती, सौराज, अंबावत, असली, अवध, तोमर अशा  विविध शेतकरी संघटनांची स्‍थापना झाली. मात्र यानंतरही भाकियूचे अस्‍तित्‍व अबाधित होते. गील २५ ते ३० वर्ष संघटनेत कार्यर  असणार्‍या लखनौमधील हरिनाम सिंह वर्मा, फेतहपूरमधील राजेश चौहान, अलीगढमधील अनिल तालान आणि स्‍याना येथील मांगेराम यांनी राकेश टिकैत यांचे नेतृत्‍व अमान्‍य करत संघटनेतून टिकैत बंधुची हकालपट्‍टी केली. हा भाकियूला मोठा धक्‍का मानला जात आहे.

 संघटनेने राजकारणात पडू नये

महेंद्र टिकैत यांनी भारतीय किसान युनियनची स्‍थापना केली.  ही एक अराजकीय संघटना आणि शेतकर्‍यांच्‍या न्‍यायहक्‍कांसाठी लढा देणारी संघटना होती. मात्र आता ही संघटना पूर्णपणे राजकीय झाली आहे. विधानसभा निवडणूक काळात राकेश टिकैत समाजवादी पार्टी आणि रालोद आघाडीला पाठिंबा दिला. हा अन्‍य पदाधिकार्‍यांना मान्‍य नव्‍हता. युनियनने राजकारण पडू नये. असे पदाधिकार्‍यांचे मत होते.

शेतकरी आंदोलनातील जबाबदारी वाटपावरुनही टोकाचे मतभेद

शेतकरी आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. यावेळी ‘भाकियु’मधील पदाधिकार्‍यांना वेगवेगळी जबाबदारी सोपविण्‍यात आली होती. यावेळी आम्‍ही आमची जबाबदारी पार पाडली मात्र काहींनी आमच्‍याकडे संशयाच्‍या नजरेने पाहिले गेले, असा आरोप होत होता. कोणत्‍याही संघटनेत अधिकाराचे विकेंद्रीकरण आवश्‍यक असते. एक व्‍यक्‍ती सर्वकाही करु शकत नाही. ‘भाकियु’मध्‍ये एकच व्‍यक्‍ती सर्व निर्णय घेणार असेल तर पदाधिकार्‍यांची गरजच काय. संघटनेतील लोकशाहीच संपुष्‍टात आल्‍याने राकेश आणि नरेश टिकैत बंधुची भाकियूमधून हकालपट्‍टी करण्‍यात आल्‍याचे पदाधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

शेतकरी आंदोलनावेळी टिकैत बंधुंनी घेतलेल्‍या राजकीय निर्णयांमुळेच ‘भाकियु’मधील मतभेदाची दरी वाढतील. टिकैत बंधुची हकालपट्‍टी करण्‍याचा निर्णय शेतकरी आंदोलनातच झाला होता फक्‍त त्‍याची जाहीर करण्‍याची तारीख १५ मे होती.

आता पुढे काय?

भाकियुचे संस्‍थापक दिवंगत महेंद्र सिंह टिकैत यांच्‍या स्‍मृतीदिनीच संघटनेत पुन्‍हा एकदा फूट पडली आहे. राकेश टिकैत हे संघटनेला राजकीय स्‍वरुप देत असल्‍याचा आरोप करत त्‍यांच्‍यासह त्‍यांचे बंधू नरेश टिकैत यांचीj[ पदावरुन हकालपट्‍टी करण्‍यात आली आहे. राकेश टिकैत यांनी संघटनेचे उपाध्‍यक्ष हरिनाम सिंह वर्मा यांच्‍याशी चर्चा करण्‍याचा प्रयत्‍न केला मात्र त्‍यांना अपयश आले. आता भारतीय किसान युनियनचे (अराजकीय) संरक्षक म्‍हणून राजेश सिंह मलिक काम पाहतील. तर राजेश सिंह चौहान हे अध्‍यक्ष तर मांगेराम त्‍यागी हे उपाध्‍यक्ष म्‍हणून काम पाहणार आहेत. तर आता अनिल तालान राष्‍ट्रीय महासचिव आणि राष्‍ट्रीय प्रवक्‍ता म्‍हणून धमेंद्र मलिक, कोषाध्‍यक्षपदी बिंदू कुमार यांची नियुक्‍ती झाली आहे.

 

 

Back to top button