ओठांवर चुंबन घेणे प्रथमदर्शनी अनैसर्गिक श्रेणीचा गुन्हा नाही : उच्च न्यायालय | पुढारी

ओठांवर चुंबन घेणे प्रथमदर्शनी अनैसर्गिक श्रेणीचा गुन्हा नाही : उच्च न्यायालय

मुंबई; ऑनलाईन डेस्क : ओठांवर चुंबन घेणे आणि स्पर्श करणे हा भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 377 नुसार प्रथमदर्शनी अनैसर्गिक श्रेणीचा गुन्हा ठरत नाही, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने  केली आहे. १४ वर्षीय मुलाच्या वडिलांनी दाखल केलेल्या पोलिस तक्रारीवरून मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्‍यायालयाने जामीन मंजूर केला.

मुंबई उपनमरमध्ये आरोपीचे दुकान आहे. तिथे ऑनलाइन गेमचा रिचार्ज करण्यासाठी संबंधीत अल्पवयीन मुलगा जात असे. एके दिवशी तो रिचार्ज करण्यासाठी गेला. त्‍यावेळी आरोपीने त्याच्या ओठांवर चुंबन घेतले. पीडित मुलाच्‍या वडिलांनी दिलेल्‍या तक्रारीनंतर पाेलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 377 अंतर्गत गुन्‍हा दाखल केला हाेता.

कलम 377 नुसार  कोणतेही अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे. तसेच या कलमानुसार जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा असून, या प्रकरणात जामीन मिळणे देखील कठीण आहे. न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी या कलमांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर केला. मुलाच्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची पुष्टी होत नाही. आरोपीविरुद्ध लावण्यात आलेल्या POCSO च्या कलमांमध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते, त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आरोपीने पीडितेच्या खाजगी भागांना स्पर्श केला होता आणि ओठांचे चुंबन घेतले होते; परंतु माझ्या मते भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अंतर्गत हा प्रथमदर्शनी गुन्हा नाही, असेही त्यांनी निरिक्षण नोंदवले.

आरोपी एक वर्षापासून कोठडीत असून, या खटल्याची सुनावणी लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. वरील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन अर्जदार जामिनाचा हक्कदार आहे. ३०,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर करण्‍यात आला.

हेही वाचलंत का ?

 

Back to top button