उद्धव ठाकरेंनी संभाजी भिडे यांचे पाय धरले का? भेटीवरून माकपचा सवाल | पुढारी

उद्धव ठाकरेंनी संभाजी भिडे यांचे पाय धरले का? भेटीवरून माकपचा सवाल

मुंबई, पुढारी ऑनलाईन: सांगलीत पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांची भेट घेतली. संभाजी भिडे यांच्या या भेटीवरून आता मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजी भिडेंचे पाय धरले का? असा सवाल केला आहे.

पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. बंद दाराआड या दोघांची भेट झाली.

त्या चर्चेचा तपशील समोर येऊ शकला नाही. या मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाने या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा राबवून महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या कौलाशी प्रतारणा करू नये,’ असा सल्लाही दिला आहे.

माकपचे राज्य सचिव, माजी आमदार नरसय्या आडम दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘ मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोरोनाशी वैज्ञानिक दृष्टीने दोन हात केले.

अशा वेळी कोरोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि अवैज्ञानिक विधाने करणाऱ्या संभाजी भिडे यांची भेट घेणे अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक आहे.

भिडे हे विद्याविरोधी गृहस्थ असून अनावश्यक विधाने करून अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला ते वारंवार आव्हान देत आले आहेत, २०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे भिडे यांनी दलित आणि दलितेतर समाजात वितुष्ट निर्माण केले.

त्यांनी सामाजिक सौख्याचं पालन करणाऱ्या महाराष्ट्र धर्माला चूड लावली. या एकाच गुन्ह्यासाठी त्यांची येरवडा तुरुंगात रवानगी करायला पाहिजे होती. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा.’

कुणी कुणाचे पाय धरले

आडम पत्रकात पुढे म्हणतात, ‘समाजात विष पेरणाऱ्या अशा माणसाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेणं धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तुरुंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत आहेत.

त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना काय आश्वासन दिले, हे जनतेला समजलं पाहिजे.

सांगली दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनीही या व्यक्तीचे पाय धरले होते. आता पंतप्रधानच त्यांचे पाय धरत असतील तर मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत नेमके कुणी कुणाचे पाय धरले, हे महाराष्ट्राला समजायला हवे.

भाजपशी युतीचा भिडेंचा आग्रह

शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपशी युती करावी, असा आग्रह मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे धरला असल्याचे समजते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भिडे यांनी भाजप उमेदवारांविरोधात झालेली बंडखोरी शमविण्यासाठी मोठी पायपीट केली होती.

कागल तालुक्यातही त्यांनी काही शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या.

हेही वाचा

पहा व्हिडिओ: कांदाटीच्या उरावर राोजचेच मरण

Back to top button