गन हातात घेऊन फिल्मी स्टाईलने हवा करणारा पोलीस शिपाई निलंबित | पुढारी

गन हातात घेऊन फिल्मी स्टाईलने हवा करणारा पोलीस शिपाई निलंबित

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश काळे याने हातात पिस्तूल घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. यांनी घेतली. त्या कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पोलीस शिपाई महेश मुरलीधरराव काळे याची नेमणुक चांदुर बाजार पोलीस स्टेशनला आहे.

शासकीय गणवेषामध्ये हातात पिस्टल सारख्या शस्त्राचा वापर करुन व्हिडीओ तयार केला. तसेच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. या कृतीतून शासकीय गणवेषावर शस्त्राचा धाक दाखवल्याचे निष्पन्न होत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांनी म्हटले आहे.

शासकीय गणवेषाचा आणि शस्त्राचा चुकीचा गैरउपयोग करुन सोशल मिडीयावर व्हिडीओ प्रसिध्द केला. या कृत्यामुळे पोलीस दलाची जनमानसात बदनामी होऊन पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे.

या कृतीचा इतर पोलीस कर्मचारी व सामान्य नागरिक यांच्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारत येत नाही. कर्तव्यामध्ये अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार व निष्काळजीपणा केलेला असल्यामुळे मुंबई पोलीसांच्या तरतुदीनुसार व पोलीस अधिनियमानुसार निलंबित करण्यांत येत असल्याचे आदेशात म्हंटलं आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button