पुढारी ऑनलाईन डेस्क
मुंबईत येऊन आव्हान द्याल तर, शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. सीबीआय मागे लावा, ईडी लावा, आम्हाला त्रास द्या आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. ते सध्या नागपूर येथे आहेत. तेथे ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, दोन दिवसांत या ज्या घटना पाहत आहोत. हा शिवसैनिकांच्या भावनांचा उद्रेक नाही, अजून काहीच सुरुवात झालेली नाही. राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या धमक्या देऊ नका. राणा 'मातोश्री'ला बदनाम करताहेत.
तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे वागा. 'झुंडशाही'ला झुंडशाहीप्रमाणे उत्तर देऊ. महाराष्ट्रात शिवसेनेला आव्हान देण्यासाठी सात जन्म घ्यावे लागतील. तुम्ही जर आमच्यावर हात उगारायचा प्रयत्न कराल तर लाखो शिवसैनिक गप्प बसणार नाही. तुम्ही घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे हे लक्षात ठेवा. शिवसैनिक मरायला आणि मारायलाही तयार आहेत. राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाहीत.
मुंबईत हजारो शिवसैनिक राणा यांच्या घराबाहेर जमले आहेत. 'राणा खाली या' असे शिवसैनिकांनी राणा यांना आव्हान दिलंय. राणांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरु आहे.
'मातोश्री'समोर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान दिले आहे. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी 'मातोश्री'समोरच ठाण मांडले आहे. मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत. राणांच्या घरांसमोरही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून राणा खाली या असे शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.