सांगली : ‘घनकचरा’वरून ‘भाजप विरुद्ध भाजप’

सांगली : ‘घनकचरा’वरून ‘भाजप विरुद्ध भाजप’
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : घनकचरा प्रकल्प आवश्यक आहे; पण चुकीची निर्णय प्रक्रिया व चुकीच्या अटी, शर्तींमुळे निविदा प्रक्रिया जनहिताविरोधी व पैशाचा अपव्यय करणारी आहे. त्यामुळे दि. 11 मार्च 2022 च्या स्थायी समिती सभेत घाईगडबडीत आयत्यावेळचा विषय आणून चर्चा न करता मंजूर केलेला ठराव रद्द करावा. फेरनिविदा काढावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू. प्रसंगी न्यायालयात जाऊ, असे निवेदन भाजपतर्फे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. स्थायी समितीचे सभापती भाजपचे असून या निवेदनामुळे 'भाजप विरुद्ध भाजप' असे चित्र निर्माण झाले आहे.

आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने, माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, दीपक माने, डॉ. भालचंद्र साठे यांनी शुक्रवारी आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, दि. 21 व दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी स्थायी समितीच्या निर्णयानुसार घनकचरा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव झाला होता. फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान हा ठराव विखंडीत करण्यासाठी आयुक्तांनी दि. 13 ऑॅक्टोबर 2020 रोजी प्रस्ताव नगरविकास विभागाला पाठवला. हा ठराव विखंडित करण्याबाबत आजअखेर शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. तरिही अयोग्य प्रकियेद्वारे दि. 11 मार्च 2022 रोजी स्थायी समिती सभेत आयत्यावेळी घाईगडबडीत विषय आणून चर्चा न करता पूर्वीच्या निविदेचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार आहे. अनेक अयोग्य व बेकायदेशीर गोष्टी घडून नुकसान करणारा हा निर्णय आहे. भाजप पूर्वीप्रमाणेच आजही भूमिकेशी व जनहिताच्या बाजूने ठाम आहे. घनकचरा प्रकल्पाच्या पूर्वीच्या निविदा प्रक्रियेला विरोध आहे. घनकचरा प्रकल्प होणे आवश्यक आहे. मात्र चुकीची निर्णय प्रक्रिया व चुकीच्या अटी, शर्ती असलेल्या प्रक्रियेस भाजपचा विरोध आहे. जनहिताची बाब व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी भाजपचा विरोध मान्य करावा व दि. 11 मार्च 2022 रोजी स्थायी समिती सभेत झालेला ठराव तात्काळ रद्द करावा. निविदा प्रक्रियेतील त्रुटी पूर्ण करून फेरनिविदा काढावी, असे निवेदन भाजपतर्फे देण्यात आले आहे.

प्रदेशाध्यक्षांना अहवाल पाठविणार : शिंदे, घनकचरा प्रकल्पाच्या निविदेप्रक्रियेबाबत यापूर्वी ठराव झाला असताना व पक्षाची भूमिका माहिती असतानाही दि. 11 मार्च 2022 रोजी पूर्वीच्या निविदा प्रकियेच्या बाजुने ठराव झाला आहे. ही बाब गंभीर आहे. महापालिका स्थायी समितीत भाजपची सत्ता आहे. सभापती भाजपचे आहेत. तरिही पक्षाच्या भूमिकेविरोधात ठराव झाला आहे. त्याबाबत सभापती निरंजन आवटी यांच्याकडून माहिती मागविण्यात येत आहे. आवटी यांच्याकडून माहिती आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठविला जाणार आहे, अशी माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी दिली.
नगरविकासमध्ये कोणाच्या चकरा, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापालिकेत महापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. गेली वर्ष-दीड वर्षे घनकचरा प्रकल्पाबाबतचा निर्णय शासनस्तरावर प्रलंबित का आहे? नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष का आहे, नगरविकासमध्ये सतत कोण चकरा मारत असते, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.
नगरविकासच्या प्रधान सचिवांना निवेदन, घनकचरा प्रकल्पाच्या निविदेसंदर्भात महानगरपालिकेच्या स्थायी समितीने दि. 11 मार्च 2022 रोजी केलेला ठराव रद्द करावा. यापूर्वी सन 2020 मध्ये तत्कालीन स्थायी समितीचा ठराव विखंडीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाठविलेला प्रस्ताव अमान्य करून फेरनिविदा काढण्यासाठी आदेश व्हावेत, या मागणीसाठी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापालिकेतील भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news