चिपळुणात धुळीच्या तुफानासह अवकाळी पाऊस | पुढारी

चिपळुणात धुळीच्या तुफानासह अवकाळी पाऊस

चिपळूण/साडवली : पुढारी वृत्तसेवा

गेले काही दिवस जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे सावट असताना संगमेश्वर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे अवकाळी पाऊस कोसळला. या दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वारे तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. देवरुख व आंगवली पंचक्रोशीत पावसासह गाराही पडल्या. तर देवरुखात मातृमंदिर संस्थेसमोर झाड कोसळले. आरवली-माखजन भागात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि पाऊस पडला. चिपळूण शहर परिसरात आज (दि. 22) सायंकाळी 5.30 वाजल्यानंतर अचानकपणे धुळीच्या वादळाने चिपळूण शहर कोंडून गेले. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे सुसाट वार्‍यासह उडालेल्या धुरळ्यामध्ये शहरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. सोबतच पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्यामुळे काही क्षणातच शहरातील वर्दळ आणि वाहतूक शांत झाली. दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी गारांसह पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

तालुक्यात गेले अनेक दिवस असह्य उकाडा जाणवत होता. त्यामुळे गरमीने नागरिक अक्षरशः हैराण झाले होते. नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत होती. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. शुक्रवारी सायंकाळी अचानक ढग दाटून आले. क्षणात मळभी वातावरण तयार झाले. आणि बघता बघता वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. पावसाबरोबरच गाराही पडल्या. बराचवेळ पाऊस बरसत होता.

देवरूख, साखरपा, संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. अचानकपणे बरसलेल्या पावसामुळे नागरिकांसह व्यापार्‍यांची तारांबळ उडाली तर आंबा व काजू बागायतदार हवालदिल झाला आहे. या पावसामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात होताच महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पावसामुळे देवरूखमधील मातृमंदिर येथे झाड कोसळण्याची घटना घडली. तर अचानक मुसळाधारेने पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.

आरवली-माखजनमध्ये गारपीटीसह पाऊस

आरवली माखजन भागात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गारपीट आणि पाऊस पडला. माखजन आणि मुरडव परिसरात गारपीट झाली. यामुळे सर्व परिसर गारठून गेला. या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे आंबा काजू पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

गेले दोन दिवस आरवली-माखजन परिसरात उष्मा कमालीचा वाढला होता. उकड्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. आज सायंकाळी 5:45 वाजता आरवली आणि माखजन भागात वादळी पावसाला सुरुवात झाली. माखजन, कोंडीवरे, आरवली, मुरडव येथे वादळाला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस कोसळला. कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. चिपळुण पसिरातील ग्रामीण भागात गारांसह पाऊस

चिपळूण शहर परिसरात आज (दि.22) सायंकाळी 5:30 वाजल्यानंतर अचानकपणे धुळीच्या वादळाने चिपळूण शहर कोंडून गेले. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे सुसाट वार्‍यासह उडालेल्या धुरळ्यामध्ये शहरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. सोबतच पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावल्यामुळे काही क्षणातच शहरातील वर्दळ आणि वाहतूक शांत झाली. दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी गारांसह पाऊस पडल्याचे वृत्त आहे.गेले आठ दिवस हवेतील उष्मा दिवसेंदिवस वाढत होता.

Back to top button