किरीट सोमय्या यांच्यानंतर नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला | पुढारी

किरीट सोमय्या यांच्यानंतर नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई; पुढारी ऑनलाईन

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र नील सोमय्या यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर आज मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाकडून नील सोमय्या यांना दिलासा मिळालेला नाही.

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या निधीत घोटाळा केल्याचा आऱोप सोमय्या पिता- पुत्रावर आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारला स्थापन झाल्यापासून हैराण करून सोडलेल्या भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अटकेची तलवार आहे. देशाचा अभिमान असलेल्या आयएनएस विक्रांत प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील यांनी भूमिगत होत वकिलांच्या मार्फत मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. काल सोमवारी न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. दुसरीकडे किरीट सोमय्यांच्या वकिलांनी सत्र न्यायालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

Back to top button