किरीट सोमय्या पुत्रासह फरार झालेत : संजय राऊत यांचा दावा | पुढारी

किरीट सोमय्या पुत्रासह फरार झालेत : संजय राऊत यांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सोमय्यांनी ‘सेव्‍ह विक्रांत’च्‍या नावाखाली महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातूनही पैसे गोळा केले आहेत. विक्रांत वाचवा निधी गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी आहे. साेमय्‍या पिता-पुत्राने जनतेचा पैसा लुटला आहे. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या कुठे आहेत? त्यांना लपलून तर ठेवले नाही ना? हे पितापूत्र परदेशात तर गेले नाहीत ना? हे फरार झाले आहेत. दिल्लीतून दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे दोन लफंगे कुठे गेले, हे शोधायला पाहिजेत. मेहुल चोक्सीसोबत सोमय्या गेले आहेत का?”, असे अनेक प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज उपस्थित केले. दरम्‍यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी  हाेणार आहे.

 माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, “कालपासून किरीट सोमय्याच्या माफीया टोळी राजभवनात जात आहे. राजभवानाने यात पडू नये.  हा खूप मोठा घोटाळा आहे. बिल्डरांना ब्लॅकमेल करून पैसा गोळा केला आहे. हे पिता-पुत्र परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत, अशी पक्की माहीत आहे”.

“किरीट सोमय्या हे मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणून सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच आहे की, हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहीत”, असा सवालही राऊत यांनी केला.

भाकाही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला हाेता. याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या  यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ११ एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडणार आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधातील फसवणुकीचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे.

Back to top button