विजय वडेट्टीवार : पुरग्रस्तांच्या खात्यावर १० हजार उद्यापासून जमा होणार | पुढारी

विजय वडेट्टीवार : पुरग्रस्तांच्या खात्यावर १० हजार उद्यापासून जमा होणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विजय वडेट्टीवार : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उद्या शुक्रवारपासून ही १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी (दि. २९) नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

पूरग्रस्तांना तातडीने जाहीर केलेली दहा हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात.

त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. उद्यापासूनच म्हणजेच शुक्रवार ३० जुलैपासून १० हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे वडेट्टीवारांनी सांगितले.

पुरग्रस्त भागाची पंतप्रधान मोदींनी करावी पाहणी

राज्यातील पूरस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी पाहणी करावी आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यालाही तातडीने मदत करावी, अशीही मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

गुजरातमध्ये काही झाले तर ते लगेच जातात. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी महाराष्ट्रात यावे अशी आमची इच्छा आहे. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनाही पूरामुळे निर्माण झालेली भीषण स्थिती आणि परिस्थितीचे गांभीर्य कळेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

केंद्राने स्वत:हून टीम पाठवावी

पूरग्रस्त भागात राज्यातील भाजप नेते, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते फिरत आहेत. त्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती द्यावी, असे ते म्हणाले. मागील वर्षीच्या आॅक्टोबरमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल केंद्राकडे ३ हजार ७०० कोटी मागितले होते.

त्यापैकी फक्त ७०० कोटी आता मिळाले आहे. त्यासाठी केंद्राचे धन्यवाद. पण, आताचे संकट खूप मोठे आहे. त्यातून सावरण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर मदत करावी, असे वडेट्टीवार म्हणाले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना उद्या शुक्रवारपासून तातडीने दहा हजार रूपयांची मदत करण्यात येईल. रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

कोकणात आणि राज्यात इतरत्र व्यापाऱ्यांना कमी व्याजावर कर्ज द्यावे लागणार आहे. जिल्हा व सहकारी बँका सक्षम असतील तर त्यांनी तो निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री आणि सहकारमंत्री यांना त्याबद्दल विनंती करणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात या बँकांची स्थिती भक्कम आहे आणि अशा स्थितीमध्ये व्यापाऱ्यांना एक ते दोन टक्के दराने कर्ज द्यावे.

हे ही वाचलं का? 

Back to top button