आरोग्य : पोटात गॅस धरतोय, चारचौघांत बसल्यानंतर उद्भवणाऱ्या या समस्येवर 'हा' आहे उपाय! | पुढारी

आरोग्य : पोटात गॅस धरतोय, चारचौघांत बसल्यानंतर उद्भवणाऱ्या या समस्येवर 'हा' आहे उपाय!

वैद्य विनायक खडीवाले 

मानवी जीवनात अजीर्ण किंवा पोटात गॅस धरणे हा सर्वांकरिता काळजीचा विषय होऊन राहिला आहे. घरातील वडीलधारी किंवा वयस्कर मंडळी जेवणाला बसली की, ‘मला बेताने वाढा, मला आता जास्त खाणे पचत नाही, पोटात गॅस धरतो’ असा सावध पवित्रा नेहमीच घेत असतात.

अनेक ज्येष्ठ मंडळी चारचौघांच्या बैठकीत बसली की, काही वेळा त्यांच्या पोटाच्या खालच्या भागात गॅस पकडतो. असा हा मोठ्या आतड्यातला वायू लगेचच ‘मोकळा’ होतो; पण ही ज्येष्ठ मंडळी लाजेकाजेस्तव हा वायू अडवतात आणि वेगवेगळ्या लहान-मोठ्या वातविकारांना जणू काही आमंत्रण देतात.

आज ही समस्या केवळ ज्येष्ठांपुरती न राहता तरुण आणि मध्यमवयीनांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

जगभर गॅसेस, इनडायजेशन, अ‍ॅपेटाईट नसणे, अरुची, पोट डब्ब होणे अशा विविध तक्रारींकरिता अब्जावधी रुपयांची, डॉलर, मार्क, येन, पौंड किमतीची नित्य प्रचंड प्रमाणात औषधे खपत असतात.

अजीर्णावर औषधे देण्याची वेळ वैद्यावर येते, याचे कारण रोग्याचा आपल्या जिभेवर ताबा नसतो, हे आहे. तत्कालीन अजीर्णावर तत्काळ लंघन यासारखा सोपा दुसरा उपाय नाही.

आपणास अजीर्ण, पोटात गॅस धरणे हा त्रास होतो म्हटल्याबरोबर तोंडात लगेच आल्याचा तुकडा ठेवावा; सोसवेल इतपत चावून खावा. कोमट पाण्यात किंचित सूंठ चूर्ण मिसळून ते पाणी प्यावे किंवा आले-लिंबू रसाचे ‘पाचक’ घ्यावे.

घरात नेहमी ओवा असतोच. पाव चमचा ओवा आणि कणभर मीठ चावून खावे. गरम पाणी किंवा लंघन यांचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे; पण त्याचा वापर करण्याइतका विश्वास तुम्हा आम्हाला नको का?

या छोट्या छोट्या उपयांनी पोटातील गॅस नेहमीकरिता हटत नसेल, तर दोन्ही जेवणानंतर आम्लपित्तवटी 3 गोळ्या, प्रवाळपंचामृत 6 गोळ्या आणि पिप्पललादि काढा 4 चमचे गरम पाण्याबरोबर घ्यावा. त्यामुळे आमाशयातील गॅस कमी होतो.

याशिवाय पाचक चूर्ण, शंखवटी यांचाही वापर लाभप्रद आहे. लहान आतड्यात गॅस धरत असल्यास दोन्ही जेवणानंतर पंचकोलासव, आम्लपित्तवटी, प्रवाळ पंचामृत घ्यावे.

पक्वाशयात वायू असल्यास सकाळ- सायंकाळ आरोग्यवर्धिनी आणि त्रिफळा गुग्गुळ प्र. 3 गोळ्या, दोन्ही जेवणानंतर आम्लपित्तवटी, प्रवाळ पंचामृत, आणि अभयारिष्ट, झोपताना गंधर्वहरीतकी चूर्ण आणि कपिलादी सहा गोळ्या घ्याव्यात.

विशेष दक्षता आणि विहार : सकाळी किमान व्यायाम, सकाळ-सायंकाळ फिरून येणे, जमल्यास रात्री जेवणानंतर फिरून येणे. नेहमी जेवत असतो त्यापेक्षा थोडे कमी जेवणे. कटाक्षाने रात्री उशिरा जेवण, उशिरा झोप टाळावी.

पथ्य : थोडेसे जेवल्यावरही पोट डब्ब होणार नाही, याकरिता कटाक्षाने सात्विकच आहार हवा. दुधी भोपळा, दोडका, पडवळ, घोसाळे अशा भाज्या, पुदिना आले, लसूणयुक्त चटणी, ज्वारीची भाकरी किंवा सुकी चपाती, मुगाचे वरण हा आहार घ्यावा.

कुपथ्य : पचायला नेहमीच जड जातात असे वाटाणा, उडीद, हरबरा, मका, पोहे, चुरमुरे, बटाटा, कांदा, रताळे अशांपासून बनलेले विविध पदार्थ, मांसाहार, मिठाई, थंड पदार्थ टाळावे.

योग आणि व्यायाम : किमान सहा सूर्यनमस्कार, हलका फुलका व्यायाम, कटाक्षाने रात्री जेवणानंतर अर्धा तास फिरून येणे.

रुग्णालयीन उपचार : तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करंजेल किंवा तीळ तेलाची पिचकारी. दशमुळे, त्रिफळा, बाहवामगज, चित्रक वनस्पती काढ्यांचा एनिमा.

अन्यषष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : बेंबीचे आसपास दोषघ्न लेपगोळीचा सोसवेल इतपत गरम आणि दाट लेप लावावा. पोटावर दिवा आणि ग्लास ठेवण्याचा प्रयोग तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावा.

चिकित्सा काल : एक महिना

निसर्गोपचार : पूर्णपणे सात्विक आहार, कटाक्षाने सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळचे जेवण कमी करावे. गरम, सूंठयुक्त पाणी प्यावे. एरंडेल तेलयुक्त पोळी खावी.

संकीर्ण : वारंवार पोटात गॅस धरत असेल आणि शरीरात फाजील वजन, चरबी वाढत असेल, तर रुग्णाने एकदा तरी ‘लिपिड प्रोफाईल’ अशा रक्ताच्या चाचण्या, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड चाचण्या करून घ्याव्या.

बर्‍याचवेळा मूळ कारण गॅस धरणे, हे माहीत असूनही घाबरलेली मंडळी उगाचच ईसीजी, अँजिओग्राफी अशा चाचण्यांना बळी पडतात. घाबरू नये, लंघन करावे.

Back to top button